मुक्तपीठ टीम
जम्मू-काश्मिरातील कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित शिक्षिकेची हत्या केल्यानंतर स्थानिक हिंदूंमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पाच महिन्यांत टार्गेट किलिंगमध्ये १३ जणांची हत्या करण्यात आली आहे. शिक्षिका रजनी बाला यांच्या हत्येनंतर १०० हून अधिक काश्मिरी पंडितांनी खोऱ्यातून स्थलांतर केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सध्या तेथे असलेल्यांनीही निघावं लागेल, अशी भीती व्यक्त केली आहे.
दरम्यान, आज सकाळी काश्मिरातील शोपियनमध्ये एका खासगी गाडीत झालेल्या स्फोटात तीन जवान जखमी झाले. ती गाडी भाज्याने घेण्यात आली होती. त्या गाडीतील स्फोट आधी प्लांट केलेल्या स्फोटकांचा, हातबॉम्बचा की सदोष बॅटरीचा ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्याचा तपास सुरु आहे.
उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला येथील काश्मिरी पंडित कॉलनीचे अध्यक्ष अवतार कृष्ण भट यांच्या म्हणण्यानुसार, मंगळवारपासून या भागात राहणाऱ्या ३०० कुटुंबांपैकी जवळपास निम्म्या कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. या हत्येनंतर ते घाबरले होते, एवढेच नाही, आम्हीही उद्यापर्यंत निघून जाऊ, सरकारच्या उत्तराची वाट पाहत आहोत. सरकारने आम्हाला काश्मीरमधून बाहेर जाण्यास सांगितले आहे, असे ते म्हणाले.
श्रीनगर परिसर सील
- पोलिसांनी श्रीनगरमधील एक भाग सील केला आहे.
- ज्या भागात काश्मिरी पंडित सरकारी कर्मचारी राहतात त्या ठिकाणी सुरक्षा वाढवली आहे.
- स्थानिक प्रशासनाने कुटुंबांच्या पलायनासंदर्भात भाष्य केलेले नाही.
- मात्र, लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी गेल्या महिन्यात काश्मिरी पंडितांना आश्वासन दिले की त्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना केल्या जातील.