मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंत्री सत्येंद्र जैन यांना अटक केल्यानंतर बडतर्फ करण्याची मागणी भाजपा आणि काँग्रेसने केली आहे. केजरीवालांनी त्यांच्या मंत्रिमंडळातून जैन यांना काढून टाकलेच पाहिजे, अशी या पक्षांची मागणी आहे.
सोमवारी दिल्लीचे कॅबिनेट मंत्री सत्येंद्र जैन यांना प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्टच्या फौजदारी कलमांतर्गत अटक करण्यात आली, अशी माहिती अंमलबजावणी संचालनालय किंवा ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
दिल्ली भाजपाचे प्रमुख आदेश गुप्ता म्हणाले की, “त्यांच्या पक्षाने यापूर्वी आम आदमी पार्टी (आप) आणि त्यांच्या नेत्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराला उघड केलं आहे. केजरीवाल त्यांच्या पक्षाच्या नेत्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर नेहमीच मौन बाळगतात. पंजाबमध्ये आपच्या एका मंत्र्याला अटक करून बडतर्फ केल्यानंतर ईडीने जैन यांची अटक केली आहे.लोकांना केजरीवाल यांनी याबद्दल बोलावे असे वाटते.”
आपचे नेते नेहमी प्रामाणिकपणाबद्दल बोलतात, परंतु आता लोकांना हे जाणून घ्यायचे आहे की ते सत्येंद्र जैन यांना त्यांच्या मंत्रिमंडळातून कधी हटवतील, असे गुप्ता म्हणाले.
दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कुमार यांनीही जैन यांची अटक हे तपास एजन्सी ईडीने उचललेले ‘योग्य पाऊल’ असल्याचे म्हटले. जैन यांना खूप आधी अटक व्हायला हवी होती. केजरीवाल अनेक वर्षांपासून त्यांना वाचवत आहेत, असेही ते म्हणाले.
ईशान्य दिल्लीचे खासदार आणि दिल्ली भाजपचे माजी अध्यक्ष मनोज तिवारी यांनी दावा केला की जैन यांना अटक करण्यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने पुरावे गोळा केले होते आणि केजरीवाल यांनी आता नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा.
“आपचे सर्व नेते जैन यांच्या अटकेनंतर त्यांचा बचाव करत आहेत, मात्र केजरीवाल यांनी स्वतः जैन यांच्या कृत्याची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा,” असे तिवारी म्हणाले.
आपच्या नेत्यांचे भाजपावर आरोप
उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्यासह आपच्या नेत्यांनी भाजपवर टीका केली आणि आरोप केला की श्री जैन यांना आठ वर्षे जुन्या “बनावट” प्रकरणात अटक करण्यात आली, कारण ते हिमाचल प्रदेशचे आपचे प्रभारी आहेत. निवडणुका आणि भाजपला तेथे आगामी निवडणुका हरण्याची भीती आहे.
जैन यांना यापूर्वी सात वेळा ईडीने समन्स बजावले होते, परंतु त्यांना अटक झाली नाही. त्यांना हिमाचल प्रदेशमध्ये आपचे प्रभारी बनवल्यानंतर, ईडीने आपची बदनामी करण्यासाठी निराधार प्रकरणात त्यांना अटक केली, असा दावा संजय सिंह यांनी केला.