अॅड. सुनिल चव्हाण
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित भ्रष्टाचाराच्या आरोपप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे हा माफीचा साक्षीदार बनला आहे. सीबीआयने वाझेला माफीचा साक्षीदार होण्यासाठी मंजुरी दिली आहे. माफीचा साक्षीदार बनल्यानंतर वाझेला आवश्यक सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडाव्या लागणार आहेत. मात्र माफीचा साक्षीदार म्हणून एखाद्या आरोपिस उभे करताना काय निकष असावेत हे जाणून घेणे महत्वाचं आहे.
माफीचा साक्षीदार कसा असावा?
- जिथे गुन्हा घडताना गुन्हेगारांशिवाय कोणतीही दुसरी व्यक्ती घटनास्थळी उपस्थित नसते. न्यायालयात गुन्हा सिद्ध करण्यासाठी सबळ पुरावा आणि साक्षीदारांची गरज असते. ज्या गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी कोणताही स्वतंत्र पुरावा आणि साक्षीदार उपलब्ध नसतो, अशा वेळी माफीचा साक्षीदार मदतीस येतो.
- माफीचा साक्षीदार म्हणजे अशी व्यक्ती जी गुन्हा करते, गुन्हा होण्यास प्रवृत्त करते, गुन्हेगाराला गुन्ह्यांत मदत करते किंवा चिथावणी देते, गुन्हेगाराला संरक्षण देते किंवा त्यांना गुन्ह्याच्या स्थानापासून पळून जाण्यास मदत करते. माफीचा साक्षीदार म्हणजे जो व्यक्ती गुन्ह्याचा साक्षीदार आहे, बेकायदेशीर कृतीशी किंवा गुन्ह्याशी जोडलेला आहे, त्याचा गुन्ह्यामध्ये सक्रिय किंवा असक्रिय सहभाग आहे आणि त्या व्यक्तीने या गुन्ह्यात त्याच्या सक्रिय किंवा असक्रिय सहभागाची कबुली दिली आहे.
- सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार नसावा, इतर कोणत्याही गंभीर गुन्ह्यात तो मुख्य आरोपी नसावा.
- न्यायालयाचे न्यायाधीश आरोपीस माफीचा साक्षीदार करण्याची परवानगी देऊ शकतात. ही परवानगी केवळ ज्या गुन्ह्यास सात वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कारावासाची शिक्षा असलेल्या प्रकरणात दिली जाऊ शकते पण हे गुन्हे आर्थिक स्वरूपाचे नसावेत अशी मार्गदर्शक तत्त्वे आहेत.
- माफीच्या साक्षीदारावर सहसा विश्वास ठेवणे धोकादायक असू शकते. काही वेळा हा माफीचा साक्षीदार उलटा फिरू शकतो आणि स्वतः साक्ष बदलू शकतो किंवा खोटी शपथ घेऊ शकतो. माफीच्या साक्षीदाराने जर खोटी साक्ष किंवा पुरावा दिला तर त्याला खोटी साक्ष देण्याच्या गुन्ह्याखाली अटक व शिक्षा होऊ शकते.
माफीचा साक्षीदार
अनिल देशमुख यांना अटक झालेल्या प्रकरणात CBI सचिन वाझे यास माफीचा साक्षीदार करण्यासाठी अर्ज करणार असल्याची बातमी वाचनात आली. त्यासाठी माफीचा साक्षीदार म्हणून एखाद्या आरोपिस उभे करताना काय निकष असावेत याविषयी थोड़ी माहिती घेवूया.— Adv Sunil Chavan (@AdvSunilChavan1) May 29, 2022
अनिल देशमुख प्रकरणातील सचिन वाझे या आरोपीविषयी काही तथ्ये…
- सचिन वाझे हा मनसुख हिरेन प्रकरणात मुख्य आरोपी असून त्याच्यावर खून करणे हा आरोप आहे.
- या प्रकरणात सीबीआय, ईडी आणि आयकर विभागाने १०० पेक्षा जास्त धाडी टाकल्या आहेत त्यात काही पुरावा मिळाला नाही का?
- या प्रकरणात अनिल देशमुख यांच्या विरुद्ध काहीही पुरावा नसल्याने माफीचा साक्षीदार म्हणून वाझे याला उभे करत नाही ना?
- यात राजकीय सूड उगावण्यासाठी सीबीआयचा वापर होत नाही ना?
- या प्रश्नांची उत्तरे जनतेला माहित आहेत.
क्रोनालॉजी समजून घ्या…
- अंबानींचे निवासस्थान असलेल्या अँटेलियासमोर स्फोटक जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या गेल्या.
- त्यातील माहितगार मनसुख हिरेन याची हत्त्या.
- दोन्ही प्रकरणी सचिन वाझे याला अटक, परमबीर सिंग यांचा सहभाग उघड.
- परमबीर सिंग यांची बदली
- परमबीर सिंग दिल्ली दौरा, एका भाजपा नेत्याची भेट.
- परमबीर यांचे १०० कोटी वसूली बाबत मुख्यमंत्री यांना पत्र.
- परमबीर सिंग यांची आणि जयश्री सदावर्ते यांची अनिल देशमुख यांच्या विरोधात याचिका.
- उच्च न्यायालयाचे सीबीआयला एफआयआर दाखल करून तपास करण्याचे निर्देश.
- ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाच्या अनिल देशमुख यांच्यावर धाडी आणि शेवटी अटक.
(अॅड. सुनिल चव्हाण हे १७ वर्षे ठाणे जिल्हा सत्र न्यायालय आणि इतर न्यायालयांमध्ये सक्रिय आहेत. अभ्यासपूर्ण युक्तिवादासाठी ते ओळखले जातात.)
ट्विटर – @AdvSunilChavan1