मुक्तपीठ टीम
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात वड्डी येथे एका फार्म हाऊसवर पुणे सीमा शुल्क विभागाने छापा टाकून तब्बल २२.८५ किलो गांजा जप्त केला. याबाबतची माहिती पुणे सीमा शुल्क विभागाने ट्विटरवरून प्रसिद्ध केली आहे. याप्रकरणी शंकर शिंगाणा या व्यक्तीला अटक केली असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मिरजमधील एका उद्योजकाच्या वड्डी येथील फार्म हाऊसवर पुणे सीमा शुल्क विभागाने सांगलीच्या केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या मदतीने छापा टाकला होता. त्या फार्म हाऊसवरुन तब्बल २२.८५ किलो गांजा जप्त करण्यात आला. त्या फार्म हाऊसचा वॉचमन म्हणून काम करणार्या शिंगाणा यास सीमा शुल्क विभागाने ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी करण्यात आली.
संबंधिताला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या कारवाईबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली होती. मिरजेत पुण्याचा सीमा शुल्क विभागाने थेट कारवाई केल्यामुळे अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत.