मुक्तपीठ टीम
आदिवासी भागातील बाल मृत्यू कमी करण्याच्या उद्देशाने नवजात शिशुंना संदर्भसेवा देताना अद्यावत आरोग्य सुविधा पुरविणारी आरोग्य विभागाची राज्यातील पहिली नवजात शिशु रूग्णवाहिका सेवेत दाखल झाली आहे. या रूग्णवाहिकेचे लोकार्पण आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आज मुंबईत झाले.
सर्व साधनसामुग्री, अद्यावत उपकरणे आणि सुविधांनी सज्ज असलेली रूग्णवाहिका राज्यातील आदिवासी भागातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगाव, अमरावती जिल्ह्यातील धारणी व चिखलदरा आणि नाशिक जिल्ह्यातील पेठ या आदिवासी भागातील शासकीय रुग्णालयांत दाखल होणार आहेत.
राज्यातली पहिली नवजात शिशु रूग्णवाहिका आज सेवेत दाखल झाली आहे. आदिवासी भागातील बाल मृत्यू कमी करण्याच्या उद्देशाने नवजात शिशुंना अद्यावत आरोग्य सुविधा पुरविणारी आरोग्य विभागाची राज्यातली पहिल्या नवजात शिशु रूग्णवाहिकेचे लोकार्पण माझ्या हस्ते आज मुंबईत झाले. pic.twitter.com/H1zdzLyfid
— Rajesh Tope (@rajeshtope11) May 26, 2022
रुग्णवाहिकेचे फायदे
रुग्णवाहिकेमार्फत नवजात बालकांना संदर्भसेवा देत असताना योग्य उपचार सुरु ठेवून इतर आरोग्य संस्थेमध्ये संदर्भित करेपर्यंत शिशुचे आरोग्य स्थिर राखण्यास मदत होईल. कमी वजनाची, कमी दिवसाची बालके, नवजात शिशुंमधील श्वसनाचे व फुफ्फुसाचे आजार, सेप्सीस, न्यूमोनिया, जलशुष्कता, हायपोथर्मिया, जंतूसंसर्ग यासारख्या गंभीर आजारांच्या रुग्णांना संदर्भीत करताना याचा उपयोग होणार असून त्यामुळे मृत्यु टाळण्यासाठी मदत होणार आहे.
नवजात शिशुला संदर्भ सेवा देताना कांगारु मदर केअर (केएमसी) या सारख्या उपचार पद्धतीचा उपयोग करुन शिशुचे आरोग्य स्थिर राखण्यास मदत होईल.
नवजात शिशु रुग्णवाहिकेमध्ये Transport Baby Warmer/ Kangaroo Bag उपलब्ध असल्याने Hypothermia मुळे होणाऱ्या अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
नवजात शिशु रुग्णवाहिकेमध्ये Suction Machine, AMBU Bag, Oxygen Hood, Cylinder, Continuous Positive Airway Pressure (CPAP) यासाखी यंत्रसामग्री व उपकरणे, औषधसाठा व प्रक्षिशीत मनुष्यबळ असल्याने संदर्भीत होताना होणारे मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
कार्यपद्धती
- या नवजात शिशु रुग्णवाहिका आदिवासी जिल्ह्यातील तालुक्याच्या उप जिल्हा रुग्णालय / ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी कार्यरत असतील.
- सद्यस्थितीत जिल्ह्यातील उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाचा यासाठी वापर करण्यात येईल. तसेच या नवजात शिशु रुग्णवाहिकेसाठी २०२२-२३ मध्ये १५ वैद्यकीय अधिकारी व १० वाहन चालकांच्या पदाची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आलेली आहे.
- नवजात शिशुंसाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व वाहन चालकांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.
- तालुक्याअंतर्गत येणाऱ्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यक्षेत्रामधून कॉल आल्यास नवजात शिशु रुग्णवाहिकेमार्फत संदर्भ सेवा पुरविण्यात येणार आहे. त्याकरिता १०२/१०८ या टोल फ्री नंबरचा उपयोग करण्यात येईल.