तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
देशाच्या राजकारणात भोंगाकारण जोरात असतं. घोटाळ्यांचे आरोप होतात. त्यावर खुलासे दिले जातात. जनसामान्यांना त्यामुळे घोटाळ्यांचे आकडे आणि प्रकार ऐकून डोळे विस्फारण्यापलीकडे काही करता येत नाही. राजकारणी, नोकरशहा पैसे खाणारच. आपण काहीच करू शकत नाही. हीच व्यवस्था आहे. टिकायचं असेल तर ती स्वीकारावीच लागेल. अशी हतबल मानसिकता वाढत असताना पंजाबातून आलेली बातमी आशा जागवणारी आहे.
पुराव्यासह तक्रार येताच, मंत्र्यांची हकालपट्टी, अटकही!
तिथं राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांच्याच मंत्रिमंडळातील आरोग्य मंत्री विजय सिंगला आणि त्यांच्या ओएसडीविरोधात पुराव्यासह लाच मागितल्याची तक्रार येताच तात्काळ कारवाई केली. ते वाट पाहत बसले नाहीत. निवृत्तीच्या उंबरठ्यावरील सरकारी अभियंत्याला लाचेसाठी छळणाऱ्या आपल्या मंत्र्याची पदावरून हकालपट्टी करत मान यांनी न्यायाचा, आपल्या पदाचा मान राखला. तेवढ्यावरच ते थांबले नाहीत. त्यांनी पोलिसांना आदेश देत गुन्हा नोंदवण्यास सांगितले. त्यानंतर विजय सिंगला आणि त्यांचे ओएसडी प्रदीप कुमार यांना अटकही करण्यात आली.
अधिकाऱ्यांचा बळी देत मंत्र्यांना संरक्षण नाही!
येथेही एक महत्वाचं. पोलिसांनी फक्त ओएसडीला आरोपी दाखवत मंत्रीमहोदयांना वाचवलं नाही. आधी मंत्रीमहोदय गडाआड गेले आणि मग ओएसडी! नाही तर भारतात छोटा मासा गळाला आणि मोठे मासे नैतिकतेची प्रवचनं द्यायला मोकळे असा प्रघातच आहे.
आम आदमी पार्टी का जन्म ईमानदार सिस्टम कायम करने के लिए हुआ है…@ArvindKejriwal जी ने हमेशा कहा है कि भ्रष्टाचार को बर्दाश्त नहीं करेंगे चाहे कोई अपना हो या बेगाना
स्वास्थ्य मंत्री के खिलाफ भ्रष्टाचार के सबूत मिलते ही तुरंत बर्खास्त किया…साथ ही FIR के आदेश दिए pic.twitter.com/0g9nqGteHb
— Bhagwant Mann (@BhagwantMann) May 24, 2022
नेमकं काय झालं?
- पंजाबमध्ये आरोग्य मंत्री विजय सिंगला आणि त्यांचे ओएसडी प्रदीप कुमारांवर आरोग्य विभागाच्या ५८ कोटींच्या बांधकामात दोन टक्के कमिशन मागितल्याचा आरोप आहे.
- या दोघांविरुद्ध मोहालीच्या फेज ८ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ आणि ८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- त्यांना पोलिसांनी अटक केली असून तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे.
- पंजाब हेल्थ सिस्टम कॉर्पोरेशनचे पर्यवेक्षक अभियंता (SE) राजिंदर सिंग यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
- यासंदर्भात त्यांनी लाचखाऊंच्या बोलण्याचे रेकॉर्डिंग करून पोलिस आणि मुख्यमंत्र्यांकडे ठोस पुरावे सादर केले होते.
त्यानंतर ही कठोर कारवाई तात्काळ करण्यात आली.
एका प्रामाणिक अधिकाऱ्याचा लाचेसाठी छळ आणि त्याचा लढा!
- अभियंते राजिंदर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते पंजाब हेल्थ सिस्टम कॉर्पोरेशन, फेज ८ मध्ये प्रतिनियुक्तीवर पर्यवेक्षक अभियंता म्हणून कार्यरत आहेत.
- साधारण महिनाभरापूर्वी ते त्यांच्या कार्यालयात काम करत असताना आरोग्य मंत्री डॉ. विजय सिंगला यांचे ओएसडी प्रदीप कुमार यांचा फोन आला.
- त्यांना आरोग्यमंत्र्यांनी पंजाब भवनात बोलावले.
- तेथे आरोग्य मंत्री आणि त्यांचे ओएसडी २०३ क्रमांकाच्या खोलीत होते.
- आरोग्यमंत्र्यांनी घाई असल्याचे सांगितले. त्यामुळे तो निघून जातोय आणि प्रदीप कुमार तुमच्याशी बोलतील.
- ते जे काही बोलतात ते मी बोलतोय असंच समजा असं सिंगला यांनी बजावलं.
- ते गेल्यानंतर प्रदीप कुमार म्हणाले की, सुमारे ४१ कोटी रुपयांची बांधकामे वाटप करण्यात आली आहेत. तसेच मार्च महिन्यातील सुमारे १७ कोटी रुपये कंत्राटदारांना अदा करण्यात आले आहेत. या ५८ कोटी रुपयांच्या कामांची दोन टक्के रक्कम म्हणजे १ कोटी १६ लाख रुपये कमिशन द्यावे.
- प्रदीपकुमारांची मागणी ऐकून राजिंदर सिंग यांना मोठा धक्का बसला.
- त्यांना खूपच मानसिक त्रास झाला. त्यांनी आरोग्यमंत्र्यांचे ओएसडी प्रदीप कुमार यांना हे काम करता येणार नसल्याचे सांगितले.
- त्यांना प्रतिनियुक्तीवरून त्यांच्या विभागात परत पाठवले तरी चालेल, असेही त्यांनी सांगितले.
- तेव्हा प्रदीपकुमार एक टक्के कमिशनवर आले.
- २० मे रोजी आरोपींना व्यवहार नीट होत नसल्याचे जाणवताच मंत्र्याच्या ओएसडीने तुम्ही १० लाख रुपये द्या, असे सांगितले. त्याचबरोबर कंत्राटदारांना जी काही रक्कम दिली जाईल, त्यात त्यांना एक टक्का द्या.
- त्यावर त्यांनी त्यांच्या खात्यात फक्त अडीच लाख रुपये असल्याचे स्पष्ट सांगत नकार दिला.
- माझी ३ लाख रुपयांची कर्ज मर्यादा शिल्लक आहे. हा मानसिक त्रास टाळण्यासाठी तुम्हाला फारतर पाच लाख रुपये देऊ शकेल, असेही ते म्हणाले.
राजिंदर सिंग लढण्याच्या भूमिकेत
- राजिंदर सिंग यांनी आपल्या तक्रारीत ८, १०, १२, १३ आणि २३ मे रोजी व्हॉट्सअॅप कॉल्सवर आलेल्या फोन नंबरचा उल्लेख केला आहे.
- यासोबतच त्याला वारंवार फोन करून लाच मागितली जात होती. शेवटी काही होणार नाही असे वाटल्याने आरोपींनी लाच न दिल्यास करिअर खराब करण्याची धमकी दिली.
- एवढेच नव्हे तर विभागात त्यांचे नुकसान होईल, असेही धमकावल्याचे सांगितले.
- त्यांची निवृत्ती नोव्हेंबरमध्ये आहे, आता आपलं कसं होणार, या भीतीने ते जगत होते.
- राजिंदर सिंह यांनी सांगितले की, त्यांचे वय ५७ वर्षे झाले आहे. ते ३० नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. अशा परिस्थितीत करिअर खराब करू नका, अशी विनंती केली.
- मी माझ्या विभागात परत जाण्यासही तयार आहे. एवढेच नाही तर जो व्यक्ती तुम्हाला कमिशनच्या स्वरूपात लाच देऊ शकतो, तुम्ही त्याला प्रतिनियुक्तीवर आणू शकता, असेही सुचवले.
- पण मंत्री आणि ओएसडी ऐकण्यास तयार नव्हते.
- अखेर तेथेच राजिंदर सिंग यांची लढण्याची मानसिकता तयार झाली असावी.
- २३ मे रोजी प्रदीप कुमारांचा राजिंदर सिंग यांना फोन आला आणि त्यांना भेटण्यासाठी सचिवालयात बोलावले.
- जिथे पाच लाख रुपये घेण्याचे मान्य केले. त्याचा ऑडिओ राजिंदर सिंग यांनी रेकॉर्ड केला.त्याचवेळी मंत्र्यांनी प्रदीपला पाच लाख रुपये देण्यास सांगितले होते.
- त्यांनी ते रेकॉर्डिंग मुख्यमंत्री भगवंत मान आणि पोलिसांना सोपवले.
- मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेत विजय सिंगला यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली.
- पोलिसांना आदेश देत गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले.
गर्दीत वेगळंपण दाखवावंच लागेल!
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या प्रकरणी घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे. त्यांनी म्हटलं, “आम आदमी पार्टीचा जन्म एक प्रामाणिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी झाला. भ्रष्टाचार आमचा असो किंवा दुसऱ्याचा असो आम्ही खपवून घेणार नाही, असे आमचे नेते अरविंद केजरीवाल नेहमीच सांगतात. त्यामुळेच आरोग्यमंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे मिळताच एफआयआर करण्याचे आदेश दिलेत.”
केजरीवालांकडूनही कौतुक!
राजकारण हे खूप विचित्र असतं. त्यामुळेच चांगली माणसं त्यापासून दूर राहणं पसंत करतात. एखाद्या नेत्यांने स्वच्छ राजकारण करायचं ठरवलं तरी त्याला तसं करु दिलं जात नाही. काहीवेळा वरचे नेते चोरच असतात असं नाही, पण आपल्या कनिष्ठ नेत्याचं महत्व वाढू नये, यासाठी त्याच्या सोबतच्या किंवा हाताखालील राजकारणी चोर असल्याचे माहित असूनही खपवून घेतलं जातं. उलट अभय दिलं जातं. पण केजरीवालांनी भगवंत मान यांचं कौतुक केलं.
आम आदमी पार्टी देश की एकमात्र पार्टी है जहाँ भ्रष्टाचार और भ्रष्टाचारियों के लिए कोई जगह नहीं है। भ्रष्टाचार के ख़िलाफ़ छोटे भाई भगवंत के फ़ैसले पर हम सबको गर्व है। Press Conference | LIVE https://t.co/Mb2eHrva1b
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) May 24, 2022
भ्रष्टाचारात गुंतलेल्या आमच्या नेत्यांनाही सोडणार नाही
अरविंद केजरीवाल म्हणाले की, “पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा आम्हाला अभिमान आहे की, त्यांनी भ्रष्टाचारात गुंतलेल्या मंत्र्याला तत्काळ पदावरून हटवले. आमच्या नेत्यांचा भ्रष्टाचारात हात असेल तर आम्ही त्यांनाही सोडणार नाही.”
भ्रष्टाचाराची माहिती कोणालाच नव्हती!
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, आज पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांच्या आरोग्यमंत्र्यांची हकालपट्टी केली. आरोग्यमंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. या भ्रष्टाचार प्रकरणाची कोणालाच माहिती नव्हती. त्याची माहिती ना मीडियाला होती, ना विरोधकांना. मुख्यमंत्र्यांना भगवंत मान हवे असते तर ते त्यात भाग घेऊन ‘सेटिंग’ करू शकले असते. पण त्याने तसे केले नाही.
हेच महत्वाचं!
केजरीवाल जे म्हणाले ते महत्वाचे विजय सिंगला जे पाप करत होते, त्याची माहिती कुणालाच नव्हती. माध्यमांनाही. त्यामुळे ते प्रकरण दाबणं अशक्य नव्हतं. पण भगवंत मान यांनी तसं केलं नाही. याआधी दिल्लीतही केजरीवाल यांनीही २०१५मध्ये अशीच भूमिका घेतली होती. त्यांच्या मंत्रिमंडळातील तत्कालीन अन्न व पुरवठा मंत्र्यांची हकालपट्टी केली होती. ते प्रकरण केजरीवाल यांनी सीबीआयकडे सोपवलं होतं.
आपल्याकडे असं होईल?
अरविंद केजरीवाल यांनी जे २०१५मध्ये केलं, भगवंत मान यांनी आता जे पंजाबात केलं, ते भारतात इतरत्र आणि आपल्या महाराष्ट्रात होऊ शकेल का? तसं घडताना दिसत नाही. भ्रष्टाचाराचेच काय, गंभीर गुन्हेगारी आरोपही लागतात. पण अशा नेत्यांना वाचवलं जातं. अराजकीय समर्थक वर्गही विरोधकांकडे बोट दाखवत त्यांच्या विचारांच्या भ्रष्ट नेत्यांचे समर्थन करतो. महाराष्ट्रच नाही तर देशातही तसंच चित्र दिसतं. उत्तरप्रदेशात शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी वाट्टेल ते करणारा नेता अजय मिश्र देशाचा गृहराज्यमंत्री! बोलावं तरी कुणा कुणाला!! अशा वेळी दिल्ली पंजाबमधील राजकारण वेगळं वाटतं. नवाब मलिकांवरील आरोप योग्य की अयोग्य ते पुढे ठरेलच. त्यात राजकारण नसेलच असे नाही. ते तुरुंगात असूनही महाराष्ट्राचे मंत्री आहेत. लाज वाटणारी बाब! प्रश्न एवढाच असं आपल्याकडे कधी घडेल. आपलं सरकार असं आपल्यासारख्या सामान्यांना पाहिजे तसं कधी वागेल?
(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात.)
संपर्क ट्विटर @TulsidasBhoite मोबाइल 9833794961