मुक्तपीठ टीम
सौदी अरेबियामध्ये पुन्हा एकदा कोरोना निर्बंध कडक केले जात आहेत. सौदी अरेबियाने भारतासह सोळा देशांमध्ये आपल्या नागरिकांच्या प्रवासावर बंदी घातली आहे. गल्फ न्यूजच्या बातमीनुसार, सौदी अरेबियाच्या नागरिकांना प्रवास करण्यास बंदी असलेल्या सोळा देशांमध्ये भारतासह लेबनॉन, सीरिया, तुर्की, इराण, अफगाणिस्तान, येमेन, सोमालिया, इथिओपिया, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, लिबिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, आर्मेनिया, बेलारूस आणि व्हेनेझुएला यांचा समावेश आहे.
सौदी अरेबियाने जाहीर केले की, या १६ देशांव्यतिरिक्त, सौदी नागरिकांना जर इतर देशांमध्ये प्रवास करायचा असेल तर त्यांच्याकडे पासपोर्ट सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ वैध असणे आवश्यक आहे. सौदी गॅझेटनुसार अरब देशांमध्ये जाण्यासाठी पासपोर्टची वैधता किमान तीन महिने असावी. इतर गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) देशांमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांकडे किमान तीन महिन्यांसाठी वैध असलेले राष्ट्रीय ओळखपत्र असणे आवश्यक आहेृ. प्रवासासाठी मूळ ओळखपत्र आणि कुटुंब नोंदणी अनिवार्य आहे.