मुक्तपीठ टीम
पावसाळ्यात येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने तयारी सुरू केली आहे. आपत्ती व्यवस्थापनानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीत २२ दिवस समुद्रात हायटाइड राहील. यादरम्यान मुंबईतील सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. हायटाइड दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आपत्ती व्यवस्थापनाने बैठक घेतली.
आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी सांगितले की, “पावसाळ्यातील पहिला हायटाइड १३ जून रोजी येईल. त्यादरम्यान समुद्रात ४.५६ मीटर उंच लाटा उसळतील. जूनमध्ये सहा दिवस आणि जुलैमध्येही सहा दिवस समुद्रात हायटाइड येईल. हा टप्पा खूप आव्हानात्मक असेल. याला सामोरे जाण्यासाठी आम्ही आधीच तयारी करत आहोत. १५ जुलै रोजी पावसाळ्यात समुद्रात सर्वाधिक लाटा उसळतील असे सांगण्यात आले आहे. त्या दिवशी ४.८७ मीटर उंचीच्या लाटा उसळतील. ऑगस्टमध्ये ५ दिवस आणि सप्टेंबरमध्येही ५ दिवस समुद्रात लाटा उसळताना दिसतील.
डेंग्यू-मलेरियाविरुद्ध विशेष मोहीम सुरू राहणार
- पावसाळ्यात डेंग्यू-मलेरिया होऊ नये यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
- विशेषत: जिथे जुने घर आणि मोठी जागा आहे, तिथे मुंबई महानगरपालिकेची टीम जाऊन फवारणी करणार आहे.
- वरळी, भायखळा, परळ, वडाळा इत्यादी भागात विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ४. टीम रेल्वे यार्ड, जुनी मिल, नेव्हल आणि बीपीटी सारख्या ठिकाणी भेट देतील आणि मलेरिया स्पॉट्स नष्ट करतील.