मुक्तपीठ टीम
काही महिन्यांपूर्वी रशिया-युक्रेनमध्ये अगदी युद्धपातळीवर लढाई सुरू होती. यामुळे अतिशय आर्थिक संकट ओढावलं गेलं आहे. आजूबाजूच्या देशांना याचा फटका बसत आहे. सध्या भारत सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या अतिरिक्त सचिवांनी काही आदेश जारी केले आहेत. जून २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत राज्यातील पिवळ्या रेशन कार्डधारकांना गव्हाऐवजी तांदूळ वाटप करण्यात येणार आहे. सध्या पिवळ्या रेशन कार्डधारकांना ८.६० रुपये किलो दराने पाच किलो गहू आणि ११ रुपये किलो दराने २.५ किलो तांदूळ देण्यात येत आहे. राज्यात ९ लाख ९५ हजार ८५८ पिवळे रेशन कार्डधारक आहेत.
उष्णतेमुळे गव्हाच्या उत्पादनात घट
- रशिया-युक्रेन युद्धामुळे जगात गव्हाची मागणीही वाढली आहे. त्यामुळे शेकडो मेट्रिक टन गहू निर्यात झाला आहे.
- आता भारत सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.
- गव्हाच्या कमी उत्पादनामुळे भारत सरकारने पिवळ्या रेशन कार्डधारकांच्या कोट्यातील गहू कापला आहे.
गव्हाऐवजी साडेसात किलो तांदूळ मिळणार
- राज्यात आतापर्यंत पिवळ्या रेशन कार्डधारकांना ५ किलो गहू आणि अडीच किलो तांदूळ मिळायचे.
- आता राज्यातील पिवळ्या रेशन कार्डधारकांना साडेसात किलो तांदूळ मिळणार आहे.
- केंद्र सरकार राज्यातील पिवळ्या रेशन कार्डधारकांना दरमहा ५ हजार ६६९ मेट्रिक टन गहू आणि २ हजार ७९२ मेट्रिक टन तांदूळ वाटप करत असे.
- जून २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत पिवळ्या रेशन कार्डधारकांना ८ हजार ४६१ मेट्रिक टन तांदूळ वाटप करण्यात येणार आहे.