मुक्तपीठ टीम
नूतन गुळगुळे फाऊंडेशन’ गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांगांच्या सेवेचा वसा अखंडपणे चालवत आहे. त्यांचे हे कार्य पाहून नीला गाळवणकर भलत्याच प्रभावित झाल्या, ‘दिव्यांग बालकांसाठीच्या उभारल्या जाणाऱ्या “स्वानंद सेवा सदना”च्या निर्मितीसाठी आपलाही हातभार लागावा म्हणून स्वतः नीला गाळवणकर यांनी आपल्या कानात घातलेली सोन्याची रिंग अगदी सहज काढून दिली सोबत या उपक्रमासाठी एक्कावन हजारांचा धनादेशही देऊन उपक्रमात आपलाही खारीचा वाटा असावा ही भावना व्यक्त केली.
आपल्यावर विश्वास टाकणाऱ्या अश्या दानशूर व्यक्ती पाहून गुळगुळे दाम्पत्य गहिवरून गेले होते. समाजातील अश्या दानशूरांमुळेच आपला हा प्रकल्प तडीस जाणार असल्याची खात्री असल्याचे या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा नूतन गुळगुळे, याप्रसंगी म्हणाल्या. विकासक प्रशांत पाटील,दर्शन राऊत यांना रुपये दोन लाख पन्नास हजारांचा धनादेश नीला गाळवणकर यांच्या हस्ते सुपूर्द करून वसतिगृहाचे संपूर्ण कामकाज सप्टेंबर २०२३ पूर्वी पूर्ण करण्याची विनंती अध्यक्षा नूतन विनायक गुळगुळे यांनी केली.
दानशूरपणाबद्दल नेहमीच चर्चा होते. जगभरातील सर्वच महान व्यक्तींनी त्याबद्दल उदात्त विचार मांडले. ‘मला जी दातृत्वाची शक्ती समजली, ती जर तुम्हाला कळू शकली, तर तुम्ही एक घासदेखील इतरांत वाटल्याशिवाय तोंडात घालणार नाही’, असे गौतम बुद्धांचे वचन आहे. पिकासो मानायचा की जीवनाचा अर्थ आयुष्याने दिलेली भेट प्राप्त करणे आणि आयुष्याचा उद्देश ती भेट इतरांना देऊन टाकणे आहे. आज समाजात अनेक दानशूर आपल्याकडील पुंजी समाजातील गरजूंना देताना त्यांच्यातील अपार दातृत्वाची प्रचिती देतात. असाच विलक्षण अनुभव नुकताच गुळगुळे दाम्पत्याला आला तो नीला गाळवणकर यांच्याकडून.
नूतन गुळगुळे फाउंडेशनच्या “स्वानंद सेवा सदना’च्या पायाभरणी सोहळ्याच्या प्रमुख अतिथी नीला गाळवणकर म्हणाल्या “नूतन आणि त्यांचे पती विनायक व मुलगा पुष्कर हे अर्नाळ्यात आले नसते तर अर्नाळ्यात आज मानवसेवेचे हे मंदिर उभे करण्याचा विचारही आला नसता, आज भारतामधील सर्वात पहिले कोविड पश्चात दिव्यांग मुलांचे वसतिगृह या गावात निर्माण होत असल्याचा आनंद समस्त अर्नाळकरांनाच नव्हे तर महाराष्ट्रासह देशाला होत असून सर्वांना अभिमान वाटावा असं हे महान कार्य आहे. राज्यपालांनंतर मला या वास्तूची पायाभरणी करण्याचा सन्मान मला देऊन, गुळगुळे कुटुंबीयांनी कृतकृत्य केलं आहे.”