मुक्तपीठ टीम
पुणे येथील लोहगाव विमानतळाकडे पर्यायी रस्ता आखणे गरजेचे असल्याने येथील क्रीडांगणाच्या काही क्षेत्रातून रस्ता प्रस्तावित करण्यासाठी आरक्षण बदलास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
लोहगाव विमानतळाकडे जाण्यासाठी संरक्षण दलाच्या हद्दीमधून १२ मीटर रुंदीचा रस्ता उपलब्ध आहे. मात्र विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी हा रस्ता बंद करावा लागत असल्याने पर्यायी रस्ता आखणे गरजेचे असल्याने शेजारील खेळाच्या मैदानातील काही भागातून रस्ता करण्याच्या अनुषंगाने आरक्षण बदलास मान्यता देण्यात आली.
सांगली मधील बाल क्रीडांगणावरील आरक्षणातून बांधकामव्याप्त क्षेत्र वगळण्यासाठी फेरबदलास मान्यता
सांगली महापालिकेच्या मंजूर विकास योजनेमध्ये बाल क्रीडांगणावरील आरक्षणातून बांधकाम झालेले क्षेत्र वगळून फेरबदल करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
आरक्षण क्र.२२० या बाल क्रीडांगण आरक्षणाचे एकूण क्षेत्र ५०० चौरस मीटर असून त्यापैकी फक्त ६३ चौरस मीटर बांधकाम झालेले क्षेत्र वगळण्यात येणार आहे. या ६३ चौरस मीटर जागेत शौचालय, बाथरुम व पाण्याचा हौद असून या ठिकाणी निवासी वापरही सुरु आहे. हे क्षेत्र आरक्षणातून वगळले तरी ४३७ चौरस मीटर क्षेत्र बाल क्रीडांगणासाठी शिल्लक राहणार आहे.