मुक्तपीठ टीम
मुंबईतील अंधेरी मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. प्रथमच कुटुंबासह परदेश पर्यटनासाठी गेलेल्या आमदार लटके यांचं दुबईत निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी या लोकप्रिय आमदाराने अखेरचा श्वास घेतल्याने अंधेरीच नाही तर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर चौफेर घेरले जात असताना शिवसेनेने एक महत्वाचा शिलेदार गमावला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार रमेश लटके यांचे पार्थिव उद्या संध्याकाळी दुबईहून मुंबईत आणले जाणार आहे.
सामान्य कुटुंबात जन्म…समाजसेवेत मग्न!
- आमदार रमेश लटके हे मूळ कोल्हापुरातील शाहुवाडीचे.
- त्यांचे कुटुंब अंधेरी पूर्व परिसरातील वांच्छा सिद्धिविनायक मंदिर परिसरात राहत असे.
- अतिशय सामान्य परिस्थितीत जन्माला आलेल्या रमेश लटके यांनी व्हिडीओ कॅसेटचा व्यवसाय केला.
- व्यवसायात जम बसवत असतानाच ते सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले.
- ते शिवसेनेच्या माध्यमातून अंधेरी पूर्व भागातील पंपहाऊस परिसरात सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत झाले.
- पंपहाऊसमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सूत्रधार झाले.
- त्या गणेशोत्सवास त्यांनी भव्य स्वरुप प्राप्त करुन दिले.
शिवसेना शाखाप्रमुख ते प्रतिकुलतेवरही आमदार!
- शिवसेनेने त्यांना शाखाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली.
- आमदार रमेश लटके हे १९९७ साली मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून गेले.
- त्यानंतरही पुढच्या दोन निवडणुकांमध्ये सन २००२ आणि २००९ मध्येही ते महापालिकेत नगरसेवक म्हणून गेले.
- भाजपाने अचानक साथ सोडल्यानंतर शिवसेनेने एकाकी लढवलेल्या २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते आमदार झाले.
- त्यावेळी भाजपाप्रमाणेच तत्कालीन काँग्रेस आमदार आणि मंत्री सुरेश शेट्टी यांना रमेश लटके यांनी अस्मान दाखवले होते.
- पुढच्या २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा नेते मुरजी पटेल यांनी बंडखोरी करून आव्हान उभे केले
- मूळ काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या, पण राज्यातील बड्या भाजपा नेत्यांच्या आशीर्वादाने बंडखोरी केलेल्या मूरजी पटेल या सर्वसंपन्न बलशाली बड्या उमेदवाराला धूळ चाटत ते पुन्हा आमदार झाले.
- त्याचे कारण अंधेरी पूर्वच्या मतदारांचा त्यांच्यावर असलेला विश्वास मानले जाते.
- त्या निवडणुकीत दबाव असतानाही आमदार रमेश लटके यांना मुरजी पटेलच्या बंडखोरीविरोधात साथ देणाऱ्या भाजपाचे सुनील यादव यांचंही ऐन तारुण्यात काही दिवसांपूर्वी निधन झाले.
- अंधेरीतील दोन नेत्यांचे अकाली निधन स्थानिकांना धक्का देणारे ठरले आहे.