मुक्तपीठ टीम
मशिदींवरील भोग्यांवरून मनसैनिकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईसंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, सत्ता येत-जात असते. सत्तेचा ताम्रपट कुणाच्याही हाती नसतो. उद्धव ठाकरे, तुमच्याही हातात नाही,” असं म्हणत मनसैनिकांवरील कारवायांचा निषेध नोंदवला. याच पार्श्वभूमीवर शिवसेने नेते अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सल्ल्याची आठवण करून देत राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
सत्तेचा जाणून-बुजून वापर कुणी करत नाही…
- पोलीस कारवाई होतच असते.
- ज्याला आंदोलन करायचं असतं, त्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या बाबतीत हे होत असतं.
- त्यामुळे सत्तेचा जाणून-बुजून वापर कुणी करत नाही.
- विरोधातल्या राजकीय पक्षांना या सगळ्या गोष्टींना सामाोरं जावं लागतं.
- त्यामुळे सत्तेचा गैरवापर किंवा अंत पाहाणं हा विषय तसाही येत नाही.
आम्ही देखील यापूर्वी आंदोलनं केलीत!!
- आम्ही देखील यापूर्वी आंदोलनं केली आहेत.
- आमच्या घरात देखील रात्री-अपरात्री पोलीस येऊन आम्हाला घेऊन जायचे.
- कधीकधी मारत मारत देखील घेऊन गेले आहेत.
- आंदोलकाला या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं.
- हा पोलीस आणि आंदोलकांचा विषय असतो.
- यात सरकारचा काही विषय नसतो.
- पोलीस शिवसेनेचं सरकार आहे म्हणून कारवाई करतात आणि काँग्रेस किंवा भाजपाच्या काळात करत नव्हते अशातला भाग नाही.
- ते आंदोलकांना शोधायला कधीही जातात.
- कुठल्याही प्रकारच्या आंदोलनात एखादा गुन्हा घडतो, तेव्हा पोलीस त्यांची कारवाई करत असतात.
बाळासाहेब सांगायचे, आंदोलन करत आहात तर दोन दिवस आतमध्ये जाण्याचीही तयारी ठेवा…
- मनसेला आवाहन करणारा मी कोण आहे?
- मी माझ्या पक्षाबद्दल बोलू शकतो.
- बाळासाहेब नेहमी सांगायचे की आंदोलन करत आहात तर दोन दिवस आतमध्ये जाण्याचीही तयारी ठेवा.
- ती तयारी ठेऊनच आम्ही आंदोलनं करायचो.
- अशा बऱ्याच आंदोलनांच्या वेळी आम्ही आतमध्ये जाऊन आलो आहे.