मुक्तपीठ टीम
राज्यात दंगली व्हाव्यात, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा यासाठी काही लोकं प्रयत्न करत आहे. त्यांच्या या डावात आपल्याला फसायचे नाही. आपण राज्यात शांती, प्रेम प्रस्थापित राहो यासाठी प्रयत्न करूया आणि आपला सामाजिक एकोपा जपूया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.
उरुण-इस्लामपूर शहरातील ईदगाह व शादीखाना कामाचा शुभारंभ सोहळा सोमवारी पार पडला. यावेळी अल्पसंख्याक मंत्री जितेंद्र आव्हाड, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
अतिशय देखणी आणि उपयुक्त वास्तू उभारण्याचे काम येत्या काळात आपल्याला करायचे आहे. या भागातील बांधवांनी खुप मदत केली आहे. प्रत्येक निवडणुकीत साथ दिली आहे. त्याची ही छोटीशी उतराई होण्याचा प्रयत्न केला असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर अल्पसंख्याक विभागामार्फत हे काम मंजूर करून घेतले होते. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची मोठी साथ लाभली. खरंतर ते आज या कार्यक्रमाला पाहिजे होते मात्र सूडबुद्धीने त्यांच्यावर कारवाई करून जेलमध्ये टाकण्याचे काम अस्वस्थ मंडळींनी केले आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
मुस्लिम बांधवांनी प्रगती करावी यासाठी आमचा सर्वांचाच कायम प्रयत्न राहिला आहे. या समाजातील लोक शैक्षणिक क्षेत्रातही पुढे जावे यासाठी आम्ही काम करत आहोत. म्हणून येत्या काळात या भागातील उर्दु माध्यमिक शाळेचाही विकास करणार आहोत असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले.
आज भारतात आणि राज्यात एक विचित्र परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. अल्पसंख्याक बांधवांच्या हक्कावर कोण गदा आणू पाहत आहेत याची कल्पना आपल्याला आहे. मात्र महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांना आम्ही कोणताही धक्का लागू देणार नाही, त्यासाठी पडेल ती किंमत मोजायला राष्ट्रवादी काँग्रेस तयार आहे असा स्पष्ट इशाराही जयंत पाटील यांनी दिला.
कोल्हापूरच्या पक्ष मेळाव्यात आम्ही सर्वांनी महाराष्ट्राचा पुरोगामी विचार राखण्याची शपथ घेतली आहे. कारण अलीकडे काही लोक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. लोक भोंग्यांवर बोलत आहेत, कोणाच्या तरी घरी हनुमान चालिसा म्हणण्याचा हट्ट करत आहे. ज्यावेळी एखाद्या राज्यकर्त्याचा आत्मविश्वास कमी होतो, त्यावेळी आपण पुन्हा निवडून येणार नाही अशी भीती असते. आणि तेव्हाच असे वातावरण तयार केले जाते. धर्मा-धर्मात तेढ निर्माण केली जाते असा टोला लगावतानाच महाविकास आघाडी सरकार पडावे यासाठी सर्व प्रयत्न झाले. मात्र सरकार आजही मजबूत आहे आणि राहणार असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.