गौरव पाटील / पालघर
राजकीय नेते संवेदनशील असले, त्यांनी ठरवलं तर ते जनतेची समस्येतून मुक्तता करू शकतात. शिवसेनेचे युवा नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हे दाखवून दिलं. शहापूर-मोखाडा भागातील आदिवासींचा नदीवरील जीवघेणा प्रवास पाहून त्यांनी तात्काळ पूल बांधण्याचे आदेश दिले. पुलाचे त्यांच्याच हस्ते उद्घाटनही झाले.
पालघर जिल्ह्यातील मोखाडा आणि ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील आदिवासींना खळाळती वैतरणा नदी ओलांडण्यासाठी धोकादायक प्रवास करावा लागत असे. ते रोजगार, बाजारहाट, दवाखाना, तसेच नातेवाईकांना भेटण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी वैतरणा लाकडी ओंडक्यावरून जात. ही जीवघेणी समस्या कळताच पर्यावरण व पर्यटन विकास मंत्री आदित्य ठाकरे यांनी दखल घेतली. तात्काळ पूल बांधण्यासाठी सूचना दिल्या. महिन्याभरात पालघर जिल्हा परिषदे मार्फत १५ लाख खर्चून या पुलाचे काम झाले. आज आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्यात आले. आदिवासींना मोठा दिलासा मिळाला.
आदित्य ठाकरेंना वैतरणेचा निर्मळ खळाळता प्रवाह पाहून राहवले नाही. ते पुढे गेले. त्यांनी पाण्याला स्पर्श करत ते चाखलंही…
स्थानिकांनी, आदिवासींनी समस्येतून सुटका झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. स्थानिक आदिवासी, गावकरी यांचं समाधान वैतरणेच्या प्रवाहासारखं… निर्मळ…खळाळतं…मनापासून दुआ देणारं…