मुक्तपीठ टीम
मुंबईत पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय मोटर बोट फॉर्म्युला-1, H2O पॉवर बोट जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईच्या हवेत सुखद गारवा असताना समुद्र किनाऱ्यांवर ही स्पर्धा रंगेल. या स्पर्धेच्या आयोजनाबाबत मुंबईतील स्पर्धेच्या निकष आणि स्थळ निश्चितीबाबत नुकतीच चर्चा झाली. क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांच्या अध्यक्षतेखाली वानखेडे स्टेडियममधील गरवारे क्लब हाऊसमध्ये बैठक पार पाडली.
यावेळी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सचिव रणजित सिंह देओल, बृहन्मुंबई पोलीस उपायुक्त गीता चव्हाण, मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अमित सैनी, कस्टम कमिशनर कुलदीप कुमार, ब्रिगेडियर सुमित सावंत, राजपाल सिंग यांच्यासह मेरी टाईम बोर्डाचे, पोर्ट ट्रस्ट, केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग, मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी, महानगर पालिका, तटरक्षक दल, नेव्ही याविभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. केदार म्हणाले, बाईक फॉर्म्युला-1 स्पर्धेच्या धर्तीवर मुंबईत आंतरराष्ट्रीय मोटर बोट फॉर्म्युला-1, H2O पॉवर बोट जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धा पहिल्यांदाच आयोजित करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय मोटर बोट फॉर्म्युला वन (F१) स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित स्पर्धा आहे. यामध्ये १, २, ३ व ४ सर्कीट मधील विजेते स्पर्धक हे या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. २० ते २४ ड्रायव्हर यामध्ये सहभागी होणार असून नोव्हेंबर २०२२ दरम्यान मुंबई येथे ही स्पर्धा घेण्याचे प्रस्तावित आहे.
आंतरराष्ट्रीय मोटर बोट फॉर्म्युला वन (F१) या स्पर्धेचे आयोजन यापूर्वी राज्यात झाले नसून आंतरराष्ट्रीय मोटर बोट फॉर्म्युला वन (F१) स्पर्धेचे आयोजन Union International Motonautique (UIM) – H२o यांच्याकडून होणार आहे. यामध्ये स्पर्धा आयोजक व राज्य शासन माध्यम राहणार आहे. स्पर्धा आयोजनासाठी संस्थेस तत्वत: मान्यता व Letter of Intent द्यावयाचे आहे. या स्पर्धा आयोजनासंदर्भात आयुक्त, क्रीडा यांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात येणार आहे.
ही स्पर्धा जागतिक स्तरावर आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत विजेत्या स्पर्धकाची व अंतिम निवड झालेल्या स्पर्धकांची स्पर्धा मुंबई येथे होणार आहे.या स्पर्धेच्या नियोजनाबाबत आज बैठक पार पडली.
आंध्र प्रदेश या राज्याने या स्पर्धेचे आयोजन दि. 16 ते 18 नोव्हेंबर 2018 या कालावधीत केले होते. कामाबाबतच्या नियोजनबाबतची माहिती क्रीडा संचालनालयास अवगत करण्याबाबत आंध्र प्रदेश पर्यटन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळविले आहे. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी पोलीस व्यवस्था, तटरक्षक दल, पोर्ट ट्रस्ट, मनपा, कस्टम, नेव्ही या विभागाने आपल्या आस्थपनाशी निगडीत ज्या ज्या बाबी आहेत. त्याबाबत सकारात्मक सहकार्य करण्याचे आश्वासन संबंधित विभागाने यावेळी आहे.