मुक्तपीठ टीम
आंबा म्हंटलं की आठवतो आपल्या कोकणचा अस्सल हापूसच! पण हापूसबरोबरच कोकणात रत्ना, पायरी, निलम असे अनेक इतरही आंबे मिळतात. आता शा तब्बल ३२ जातींचे कोकणातील आंबे एकाच ठिकाणी पाहण्याची संधी मुंबईकर आणि ठाणेकरांना मिळत आहे. त्यासाठी तुम्हाला ‘ग्लोबल कोकण’ आणि ‘कोकण भूमी प्रतिष्ठान’ आयोजित ठाण्याच्या शेतकरी बाजारात जावं लागेल. घाटकोपरच्या आर सिटी मॉलमधील प्रदर्शनानंतर आता महाराष्ट्र दिनापासून ठाण्यातील टीएमसी ग्राऊंडमध्ये शेतकरी आंबा बाजार भरलाय.
या बाजारात आंबे विकत घेण्याबरोबरच गोडसर, केशरी-पिवळसर रंगाच्या आंब्याच्या लागवडीसाठी कोकणची माती, हवा कशाप्रकारे अनुकूल आहे, याची माहिती ऐकता येईल. ‘ग्लोबल कोकण’ आणि ‘कोकण भूमी प्रतिष्ठान’तर्फे आयोजित ‘मँगो फ्ली’ उपक्रमांतर्गत घाटकोपर येथील आरसिटी मॉलमध्ये या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. आता महाराष्ट्र दिनापासून . कोकणच्या शेतातून ते थेट ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध असणार्या हापूसची ग्राहकांना खरेदी करता येईल. याचे उद्घाटन २९ एप्रिल रोजी करण्यात आले. रत्नागिरी, पावस, मालवण, राजापूर, विजयदुर्ग आदी भागातील हापूसचे १० स्टॉल्स लावण्यात आले असून खुद्द शेतकरी यांची विक्री करणार आहेत. या माध्यमातून ३५० हून अधिक शेतकऱ्यांना व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. हिरानंदानी ईस्टेट, मॅकडॉनल्ड जवळ टीएमसी ग्राऊंडमध्ये ‘शेतकरी आंबा बाजार’चे आयोजन करण्यात आले आहे. जिथे ग्राहकांना नैसर्गिकरित्या पिकवलेल्या अस्सल हापूस आंब्याची खरेदी करता येईल. हा ‘शेतकरी आंबा बाजार’ ३१ मेपर्यंत सुरु राहील.
”हापूस आंब्याचा लोकल ते ग्लोबल ब्रँड विकसित करत शेतकऱ्यांना व्रिकीसाठी नवीन व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असून मॉल्स, महामार्ग, लोकल बाजार ते परदेशात आंबा विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.” असे ‘कोकण भूमी प्रतिष्ठान’चे संस्थापक संजय यादवराव म्हणाले. संस्थापक निलेश सांबरे यांच्या ‘जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणीक संघटने’चे या उपक्रमाला सहकार्य लाभले असून पालघरमधील आदिवासी माहिला यंदा शेतकर्यांना आंबा विक्रीसाठी मदत करणार आहेत. ”आंबा विक्रीसाठी शेतकऱ्यांनी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांवर अवलंबून न राहता स्वावलंबी बनावे, त्यांना नवीन बाजारपेठ उपलब्ध व्हावी, परिश्रमाचा योग्य आर्थिक मोबदला मिळावा या दृष्टीने राबवण्यात येणारे हे उपक्रम वाखणण्याजोगे आहेत.” असे ‘समृद्ध कोकण शेतकरी संघटने’च्या सचिव मनीषा डमरी म्हणाल्या. ”२९ एप्रिल ते १ मे पर्यंत हे प्रदर्शन सुरु राहणार असून जास्तीत जास्त नागरिकांना याला भेट द्यावी.” असे आवाहन ‘आयलीफ कनेक्ट’चे संस्थापक प्रतिश आंबेकर यांनी केलं आहे.
‘आय लीफ कनेक्ट’च्या सहकार्याने आयोजित ’मँगो फ्ली’ अंतर्गत आंब्याची विक्री, मँगो कॅफे आणि सोबत लाईव्ह मनोरंजन…असा उपक्रम पार पडणार आहे. ’रिजनल फूड्स’चे सह संस्थापक आणि सेलिब्रिटी शेफ सनी पावसकर यांनी आंब्यापासून बनवलेल्या विविध स्वादिष्ट पदार्थांचा यावेळी आस्वाद घेता येईल.
या संपूर्ण उपक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मार्गदर्शन, तर सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील, कृषी मंत्री दादाजी भुसे यांचा पाठिंबा असून महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, अपेडा यांचे सहकार्य लाभले आहे.