मुक्तपीठ टीम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमधील जाहीर सभा चर्चेचा विषय ठरली आहे. मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्याबरोबरचं या सभेचे ठिकाणही चर्चेचा विषय बनला आहे.मुंबई-पुणे-ठाणे यानंतर औरंगाबादच का, याचं उत्तर मिळवण्यासाठी ३४ वर्षे मागे जावं लागेल. मनसेच्या निवडीत शिवसेनेच्या हिंदुत्ववादी प्रवासाची झलक दिसते. ओरंगाबादच्या ज्या मैदानात राज ठाकरेंची सभा होत आहे, तिथंच १९८८मध्ये शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरें यांची सभा झाली होती. त्याच मैदानावरून बाळासाहेबांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर करा, ही पहिली घोषणा केली होती.
खान की बाण…शिवसेनेच्या मनाला हात घालणारा प्रश्न याच मैदानातून!
- औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलून संभाजीनगर करण्यात यावं, अशी भूमिका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच पुढे आणली होती.
- १९८८ मध्ये मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या एका सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी ही मागणी केली होती.
- औरंगाबादमधील प्रत्येक निवडणुकीत पूर्वी ‘खान हवा की बाण हवा’, हे शिवसेनेचं ब्रीदवाक्य असायचं.
- याच राजकारणावर त्यांनी वर्षानुवर्षे औरंगाबादसह मराठवाड्याच्या काही भागात स्थान निर्माण केलं.
- मराठवाडा मुंबई-ठाण्यानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला ठरला.
- त्याचमुळे शिवसेनेच्या हिंदुत्ववादी मतदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी मनसेनं हेच मैदान निवडलं.
- आता याच मैदानावर राज ठाकरे आज सभा घेणार आहेत.
- ही सभा जाहीर करताना औरंगाबादचा उल्लेख त्यांनी ‘संभाजीनगर’ असा केला होता.
- यामुळे, राज ठाकरे आपल्या सभेत मशिदींच्या भोंग्यांसोबतच ‘संभाजीनगर’ नामांतराचा मुद्दा उपस्थित करतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज १ मे रोजी औरंगाबादेत सभा होणार आहे. मशिदीवरील भोंगा आणि हनुमान चालिसाचा मुद्दा उपस्थित करून राज ठाकरेंनी राज्यातलं राजकीय वातावरण तापवलं आहे. तसेच त्यांनी भोंगे उतरवण्यासाठी ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधल्या सभेमुळे मनसे विरुद्ध शिवसेना संघर्ष दिसत आहे. हिंदुत्वावरून मनसेच्या बॅनरच्या बाजूला शिवसेनेनं बॅनर लावून मनसेला उत्तर दिले आहे. खरे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबच, अशा आशयाचे बॅनर शिवसेनेनं लावले आहेत.