मुक्तपीठ टीम
सोशल मीडिया म्हटलं की अनेक नाक मुरडतात. किंवा बहुतेक सेल्फीगिरीसाठी वापरतात. पण या माध्यमात मोठी सकारात्मक शक्ती आहे. ती वापरत एका तरुणाने डिलिव्हरी बॉयचं काम करणाऱ्या शिक्षकाला नवी कोरी मोटरसायकल मिळवून दिलीय.
आदित्य शर्मा हे आयटी प्रोफेशनल आहेत. त्यांनी एकदा कुटुंबासाठी काही अन्नपदार्थ ऑर्डर केले. ते घेऊन डिलिव्हरी बॉय आला तेव्हा तेव्हा त्यांना वाईट वाटले. कारण तो राजस्थानच्या ४२ अंश सेल्सिअस कडक तापमानात सायकलवर आला होता. दुर्गा मीना या डिलिव्हरी बॉयची चौकशी केली असता कळलं की ते शिक्षक आहेत. नोकरी नसल्याने उपजीविकेसाठी हे काम करतात.
दुर्गा मीना हे बी. कॉम. झाले आहेत. त्यांना नोकरी नसल्याने गेले चार महिने ते डिलिव्हरी बॉयचे काम करतात. त्यांना एम. कॉम. करायचे आहे. पण गरीबीमुळे शक्य होत नाही. सध्या त्यांना दहा हजाराचे उत्पन्न होते.
आदित्य शर्मांनी चौकशी केल्यावर दुर्गा मीना म्हणाले की आता दिवसाला १०-१२ तरी डिलिव्हरी कराव्या लागतात. जर मला बाईक मिळाली तर खूप त्रास कमी होईल. त्यांची इच्छा होती की, त्यांचे डाउन पेमेंट करावं. ते स्वतः ईएमआय भरतील. आणि चार महिन्यांत डाउन पेमेंटची रक्कम व्याजासह परत करतील.
आदित्य शर्मांनी ट्विटरसह सोशल मीडियावर साद घातली. दुर्गा मीनांच्या मोटरसायकलीसाठी ७५ हजार गोळा करण्याचे लक्ष्य मांडले. आणि चमत्कार घडला. २४ तासात पैसे गोळा झाले. त्यांना दुर्गा मीनाला २४ तासात मोटारसायकल भेट देता आली. त्यांना सांगावं लागलं. “जे अजूनही पैसे पाठवत आहेत त्यांनी कृपया पाठवू नये. कारण निधी संकलन प्रक्रिया थांबली आहे. आता दुर्गा मीना खूप खुश आहेत.”
पाहा व्हिडीओ: