मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत नरेंद्र मोदींनी इंधन दरांवरुन महाराष्ट्रासह काही राज्यांना सुनावलं. राज्यांनी त्यांच्या नागरिकांना फायदा दिला नाही आणि पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी न करून महसूल मिळवला. यावेळी पंतप्रधान मोदींनी राज्यांची थेट नावंच घेतली. राज्यांची नावं आणि पेट्रोलचे दर अशा यादीच वाचली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, जागतिक संकटात केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणे पुढे जाण्याची गरज आहे.
केंद्र आणि राज्यांनी एकत्र येण्याची गरज…
राज्यांना सल्ला देताना पंतप्रधान म्हणाले की, जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. मात्र अनेक राज्यांनी तसे केलेले नाही. जागतिक आव्हानाच्या या काळात केंद्र आणि राज्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी राज्यांना आवाहन केले.
काही राज्य सरकारांनी जनतेवर अन्याय केला
- पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी केंद्र आणि राज्यांमध्ये सामंजस्य आवश्यक आहे.
- युद्धजन्य परिस्थितीमुळे पुरवठा साखळी प्रभावित झाली आहे.
- अशा वातावरणात आव्हाने वाढत आहेत.
- आम्ही नोव्हेंबरमध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते.
- राज्यांनाही तसे करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
- काही राज्यांनी व्हॅट कमी केला पण काही राज्यांनी व्हॅट कमी न करून त्यांच्या राज्यातील जनतेला लाभ दिला नाही.
- त्यामुळे या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहेत.
- एकप्रकारे हा या राज्यांतील लोकांवर अन्यायच आहे, पण त्यामुळे शेजारील राज्यांचेही नुकसान होत आहे.
- जी राज्ये कर कमी करतात त्यांचा महसूल बुडतो.
- गुजरात आणि कर्नाटकने कर कमी केले आहेत.
- जर गुजरातने कर कमी केला नसता तर त्यालाही साडेतीन हजार कोटींपेक्षा जास्त महसूल मिळाला असता.
- त्याच वेळी, काही राज्यांनी व्हॅट कमी केला नाही आणि या कालावधीत तीन हजार ते पाच हजार अतिरिक्त महसूल मिळवला.
पंतप्रधान मोदी इथेच थांबले नाहीत, त्यांनी राज्यांची नावे घेतली आणि सांगितले की, मी कोणावरही टीका करत नाही. तुमच्या राज्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करत आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू आणि झारखंड या राज्यांनी या ना त्या कारणाने केंद्राच्या सल्ल्याकडे लक्ष दिले नाही. त्याचा नागरिकांवर बोजा पडत राहिला. आता मी तुम्हाला प्रार्थना करतो की, गेल्या नोव्हेंबरमध्ये देशाच्या हितासाठी जे करायचे होतं त्याला सहा महिन्यांनी उशीर झाला आहे. व्हॅट कमी करून जनतेला फायदा द्या. भारत सरकारला येणाऱ्या महसूलापैकी ४२ टक्के महसूल राज्यांना जातो. जागतिक संकटाच्या काळात संघ म्हणून काम करण्याची गरज आहे.
मोदींनी वाचली विविध राज्यांमधील पेट्रोल-डिझेल महागाईची यादी….
- मुंबईत १२० रुपये
- आज चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत सुमारे १११ रुपये आहे
- हैदराबादमध्ये ११९ रुपयांपेक्षा जास्त,
- जयपूरमध्ये ११८ पेक्षा जास्त,
- कोलकात्यात ११५ रुपयांपेक्षा जास्त,
- जम्मूमध्ये १०६ रुपये,
- लखनऊमध्ये १०५ रुपये
- गुवाहाटीमध्ये १०५ रुपये,
- गुडगावमध्ये १०५ रुपये
- उत्तराखंड या छोट्या राज्यातील देहरादूनमध्ये पेट्रोलचे दर १०३ रुपये आहे.
- दमण-दीवमध्ये पेट्रोलचा दर १०२ रुपये,
- पंतप्रधान म्हणाले की, मी सर्वांना विनंती करतो की सर्व राज्यांनी देशाच्या हितासाठी पुढे जावे.
- कृपया संपूर्ण देशाला मदत करा.