अपेक्षा सकपाळ / मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान राणा दाम्पत्यांनी केले होते. मात्र शिवसैनिकांच्या आक्रमतेपुढे त्यांना घराबाहेरही पडता आले नाही. त्यांनी शिवसैनिकांनी खार पोलीस ठाण्यात राणांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी राणांना अटक करून त्यांना खार पोलीस ठाण्यात नेले. मात्र तिथे खासदार आणि आमदार असणाऱ्या पती-पत्नीनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसाठी भलतेच शब्द वापरले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे * आहेत असे शब्द आधी रवी राणा आणि नंतर नवणीत राणा यांनी वापरले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात शिवसैनिकांकडून राणांविरोधात गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
राणांवर गुन्हा दाखल होताच ते आक्रमक होताना दिसले. राणा दाम्पत्याला घराबाहेर काढताना मोठा पोलीस बंदोबस्त केला होता. यानंतर त्यांना खार पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि त्यावेळी त्यांनी दोघांनी हे वक्तव्य केलं आहे. वरिष्ठ पदावर बसलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेविरोधात असं वक्तव्य करणं हे महाराष्ट्रासाठी अतिशय निंदनीय आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुद्धा मुख्यमंत्रींविरोधात वक्तव्य केल्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणा यांना अटक करण्यात आली असून त्यांची आजची रात्र पोलीस ठाण्यात जाण्याची शक्यता आहे. उद्या त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. कलम १५३ (अ) अतंर्गत राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांसाठी खालची भाषा, शिवसैनिकांनाही विचित्र हातभाव!
शिवसैनिकांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी रवी राणा, नवनीत राणा यांना पोलीस सोबत घेऊन जात असतानाही दोघांनीही शिवसैनिकांच्या दिशेने हातवारे करत चिथावणीखोर भाषा सुरु ठेवली, अशी तक्रारही करण्यात येत आहे. रवी राणा यांनी हाताचे इशारे करत बांगड्या घालण्याचे हावभाव केले. पुढे पोलीस ठाण्यात संध्याकाळी ५. ४० च्या दरम्यान आधी रवी राणा यांनी * शब्द वापरला. नंतर नवनीत राणा यांनीही तेच शब्द वापरले. त्यामुळे त्यांनी खालची भाषा वापरल्याने नव्याने त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.