मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपल्या आक्रमक हिंदुत्ववादी धोरणाची धार आणखी वाढवत नेण्याच ठरवलेलं दिसत आहे. त्यानुसार ३ मे रोजी राज्यभर महाआरती आणि हनुमान चालिसा पठन करण्यात येणार आहेत. त्या दिवशी अक्षय तृतीया असल्याचं सांगितलं गेलं आहे. पण त्याच दिवशी ईदही आहे. राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांवरील अजान बंद करण्यासाठी ईदचीच मुदत दिली आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादरमधील शिवतीर्थ निवासस्थानी आज मनसेची बैठक झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसेच्या पुढील कार्यक्रमांची माहिती दिली.
अयोध्या दौऱ्यासाठी विशेष ट्रेनसाठी दानवेंना पत्र
मनसेनं राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचं मोठ्या प्रमाणावर नियोजन सुरु केलं आहे. पाच जून रोजी राज ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. तेथे जाण्यासाठी खास ट्रेन मिळावी, यासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना मनसे पत्र लिहिणार आहे.
राज्य पोलीसही तयारीत!
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंच्या इशाऱ्याची दखल घेत राज्य पोलीसही पूर्ण तयारीत असल्याचं सांगितलं.
“राज्यातील परिस्थिती बिघडेल असं वाटत नाही. पण आम्हीदेखील पूर्ण तयारीत आहोत. कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी काळजी घेत आहोत,” असंही ते म्हणालेत.