मुक्तपीठ टीम
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिस्ट्युट्सच्या वतीने १३१ गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. नोकरदार आणि गृहिणी महिलांना या शिष्यवृत्तीसाठी प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी दिली.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या, नोकरदार, गृहिणी महिलांनी उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, तसेच त्यांचा हुद्दा व आर्थिक स्तर उंचावला जावा, हा उद्देश या शिष्यवृत्तीमागे आहे. समाजातील सर्व स्तरांमध्ये समान शिक्षण मिळावे ही डॉ. आंबेडकरांची संकल्पना कृतीत आणण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांना दुर्बल घटकांना सक्षम बनवायचे होते. आनंदाची बाब म्हणजे यंदा राष्ट्रीय शिक्षण धोरणातही हे समाविष्ट करण्यात आले आहे. यामुळे आयुष्यभर नवनवीन शिक्षण घेणे शक्य होणार आहे.”
सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मटेरियल्स अँड लॉजिस्टिक मॅनेजमेंट (पीजीडीएमएलएम), पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मार्केटिंग मॅनेजमेंट (पीजीडीएमएम), पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फायनान्स सर्व्हिसेस (पीजीडीएफएस), पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फॉरेन ट्रेडिंग (पीजीडीएफटी), पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंडस्ट्रियल मॅनेजमेंट (पीजीडीआयएम) हे एक वर्षाचे पाच अभ्यासक्रमासाठी, तसेच बारावीनंतर पदवी अभ्रासक्रमासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार या अभ्यासक्रमाच्या वेळा असणार आहेत. या अभ्यासक्रमात सहभागी होऊन शिष्यवृत्ती मिळवू इच्छिणाऱ्यांनी sukhvinder.kaur@suryadatta. edu.in या ईमेलवर दि. ३० एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज पाठवावेत. अर्जाची छाननी करून शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांची यादी दि. १५ मी २०२२ पर्यंत जाहीर करण्यात येणार आहे, असे प्रा. डॉ. चोरडिया यांनी नमूद केले.
प्रा. डॉ. संजय चोरडिया पुढे म्हणाले, “जसे ज्ञानाअभावी व्यक्ती आणि समाजाचे नुकसान होते, तसेच एखादी व्यक्ती वा समूहाला शिक्षण नाकारणे म्हणजे माणूस म्हणून त्याचे अस्तित्व नाकारून त्याच्या क्षमता मारून टाकणे होय, अशी बाबासाहेबांची शिक्षणविषयक धारणा होती. त्यांना उच्च शिक्षणाद्वारे समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही मानवी मूल्ये स्वीकारलेला एक स्वाभिमानी आधुनिक समाज निर्माण कार्याचा होता. हाच त्यांच्या शैक्षणिक चळवळीचा खरा मूलाधार होता. सर्व सामाजिक दुखण्यांवर उच्च शिक्षण हेच एकमेव औषध आहे, असे डॉ. आंबेडकर एका सभेत म्हणाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षण विषयक विचार अत्यंत प्रेरक असून ते म्हणायचे त्याप्रमाणे शिक्षण हाच जीवनाच्या प्रगतीचा मार्ग आहे, हे जाणून सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने त्यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे.”