डॉ.संदीप अडके / व्हा अभिव्यक्त!
मेड इन इंडिया डॉर्नियर-228 विमानाने मंगळवारी पहिले उड्डाण केले. आसाममधील दिब्रुगड ते अरुणाचल प्रदेशातील पासीघाट दरम्यान ही विमानसेवा सुरु झाली आहे. केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांच्या हस्ते या विमानाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. एकीकडे देशातील दुर्गम अशा ईशान्येतील राज्यांमध्ये स्वदेशी विमानांची सेवा सुरु होत असताना आपल्या महाराष्ट्रातील सोलापूर मात्र विमान सेवेपासून वंचीतच राहिले आहे. त्याचे कारण तेच आहे, एका साखर कारखान्याची चिमणी! जी हटवण्यासाठी वारंवार आदेश आले, पण स्थानिक राजकारणातून ती सतत वाचवली गेली. सोलापूरकरांसाठी कायमचा हवाई वाहतूक रोखो करत.
आजपासून अतिशय दुर्गम भाग असलेल्या अरुणाचल प्रदेशात विमान सेवा पोहोचवण्यासाठी अलायन्स एअर कंपनीने डॉर्नियर-228 ही १७ आसन क्षमता असलेली छोटी व संपूर्ण भारतीय बनावटीची विमान सेवा सुरू केलेली आहे. त्यामुळे चीन व म्यानमारच्या सीमेपर्यंत लोकांना जलद गतीने प्रवास करता येईल. परंतु ज्या सोलापूरचे सुपुत्र स्वर्गीय शेठ वालचंद हिराचंद दोशी यांनी १९४० साली बंगळुरू येथे स्थापलेल्या हिंदुस्थान एअरक्राफ्ट सध्याच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीत संपूर्ण भारतीय बनावटीचे हे विमान तयार केले असून त्याची सेवा सोलापूर मध्ये उपलब्ध झालेली नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे. विशेष म्हणजे सोलापूरच्या सुसज्ज होटगी रोड विमानतळास अलायन्स एयर या कंपनीस सर्वप्रथम सोलापूर ते हैदराबाद या रुटवर विमानसेवा उड्डाण योजनेअंतर्गत प्रदान करण्यात आलेली आहे. परंतु शेजारील सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या ९० मीटर अनधिकृत कोजनरेशन चिमणीने होटगी रोड विमानतळ बंद करून ठेवले आहे. या सर्व बाबी माहिती असून सुद्धा व भारतातील सर्व प्राधिकरणाने व सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाने ही चिमणी अनधिकृत असून विमानतळासाठी अडथळा ठरल्यामुळे त्वरित पाडून टाकावी असे आदेश सोलापुरातील आयुक्त पी. शिवशंकर व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना वारंवार दिले असताना हे चिमणी पाडकाम त्यांनी मुद्दामूनच रखडवले आहे. ही सर्व माहिती असून सुद्धा नुकत्याच झालेल्या दिल्लीतील अधिवेशनात सोलापूरचे खासदार जून महिन्यामध्ये सोलापुरातून सतरा सीटर डॉर्नियर विमानसेवा सुरु करावी अशी नागरी उदयन मंत्री श्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे मागणी करताना दिसून आले.
खरेतर ही चिमणी पाडल्याशिवाय डीजीसीए कोणत्याही नागरी विमान वाहतूकीस होटगी रोड विमान तळावरून परवानगी देणार नाही ही गोष्ट सर्वश्रुत आहे. शेठ वालचंद हिराचंद दोशी यांना ‘भारताचे दळणवळणाचे जनक’ असे संबोधले जायचे. यांच्या जन्मगावी व त्यांच्याच कारखान्यात बनवलेली विमानसेवा उपलब्ध होऊ शकत नाही ही सोलापूरच्या दृष्टीने अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.
(डॉ.संदीप आडके हे वैद्यकीय व्यावसायिक असून सोलापूरातील विकासात्मक कार्याच्या मार्गातील समस्या सोडवण्यासाठी सोलापूर विचार मंचच्या माध्यमातून प्रयत्नरत असतात.)