मुक्तपीठ टीम
मध्यप्रदेशातील काही पत्रकार आणि रंगकर्मींना पोलिसांनी नग्न करून त्यांचे फोटो सेशन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आधी तर ते पत्रकार नसून काही संशयास्पद प्रवृत्तीचे लोक असल्याचा दावा केला. मात्र, नंतर ते पत्रकार असल्याचं सिद्ध झाल्यावर पोलिसांनी भलताच दावा केला. पोलिसांनी सांगितले की पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपींनी पोलीस कोठडीत आत्महत्या करू नये म्हणून आम्ही त्यांचे कपडे काढले जातात. मात्र फोटो काढून ते व्हायरल करण्याबद्दल ते काहीच सांगत नाही. पत्रकार आणि समाजातूनही संताप व्यक्त होऊ लागल्यानंतर दोन पोलीस अधिकाऱ्यांवर तात्पुरती कारवाई झाली आहे. कपडे काढून नग्न सेशन हे कोणत्या कायद्यात बसतं, या मुद्यावर संताप वाढतच चालला आहे.
पत्रकारांच्या नग्न फोटो सेशनचं प्रकरण आहे तरी काय?
- मुळात प्रकरण सुरु झालं ते मध्यप्रदेशातील सिधी जिल्ह्यातील एक नीरजकुमार कुंदर यांच्या अटकेपासून.
- नीरजकुमार हे इंद्रावती नाट्य समितीचे संचालक आहेत. ते विंध्याचलातील कला संवर्धनासाठी कार्यरत आहेत.
- त्यांनी भाजपाचे स्थानिक आमदार केदारनाथ शुक्ला आणि त्यांचे पुत्र गुरुदत्त यांच्याविरोधात काही वक्तव्य केलं होतं.
- त्याप्रकरणी त्यांना पोलिसांनी अटक केली.
- त्यांच्या अटकेविषयी पोलीस ठाण्यासमोर काही नाट्यकर्मी आणि पत्रकारांनी निदर्शने केली.
- त्या निदर्शनांच्यावेळी बघेली भाषेत यूट्यूबवर चॅनल चालवणारे आणि एका राष्ट्रीय न्यूज चॅनलससाठी काम करणारे कनिष्क तिवारी आणि इतर काही पत्रकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- त्यांच्यावरही तेच आरोप ठेवण्यात आले.
- पोलिसांनी अटक केल्यानंतर पत्रकार आणि नाट्यकर्मींचे तोकड्या चड्डीशिवाय सर्व कपडे काढण्यात आले.
- तेवढ्यावरच पोलीस थांबले नाहीत. त्यांनी तशा अवस्थेत त्या सर्वांचे फोटो काढले.
- ते बाहेरही देण्यात आले असावेत, त्यामुळे ते सर्वत्र व्हायरल झाले.
पोलीस काय सांगतात?
- सिधी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकवर फेक आयडीवरून वाईट कमेंट केल्या जात होत्या.
- याप्रकरणी पोलिसांनी नीरज कुंदरला अटक केली होती. त्यावर कनिष्क यांच्यासह नाट्यकर्मी, सामाजिक कार्यकर्त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यासमोर निषेध नोंदवला.
- पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. कनिष्क तिवारी हा युट्युबर असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीही काही तक्रारी होत्या.
- पोलिसांच्या मते, कोतवाली पोलीस ठाण्यात कपड्यांशिवाय या सर्वांचे फोटो काढून कोणीतरी ते सोशल मीडियावर व्हायरल केले.
- कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६२/२२ कलम ४१९, ४२०, आणि आयटी कायद्याच्या ६६सी, ६६डी अन्वये तपास सुरू आहे.
- फोटो व्हायरल झाल्याप्रकरणी तपास डीएसपींकडे सोपवण्यात आला आहे.
- पत्रकारच नाही तर इतर कुणीही नागरिक असलं तरी त्याच्या अटकेनंतर त्याचे कपडे काढून त्याचे नग्न फोटोसेशन करणे कोणत्याही कायद्यात बसत नाही. त्यामुळे सर्वत्र मध्यप्रदेशमधील पोलिसांचा निषेध करण्यात येत आहे.
पाहा: