मुक्तपीठ टीम
येत्या २७ फेब्रुवारीपासून हरिद्वार कुंभ मेळावा सुरू होणार आहे. उत्तराखंडाच्या सरकारने कुंभमेळाव्यात गंगेत स्नान करण्यास इच्छुक असलेल्या सर्व यात्रेकरूंना नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. कुंभमेळ्यात नोंदणीशिवाय आणि कोरोना संक्रमित नसल्याच्या अहवालाशिवाय प्रवेश मिळणार नाही आहे.
कुंभमेळाव्याचे अधिकारी दीपक रावत यांनी सांगितले की, “हरिद्वारमधील हॉटेल्स आणि आश्रमांमध्ये खोली बुक करण्यासाठी सर्वप्रथम त्या व्यक्तीला नोंदणी करणे आणि कोरोना संक्रमित नसल्याचा अहवाल असणे आवश्यक आहे. तसेच यात्रेकरुंच्या मदतीसाठी रजिस्ट्रेशन पोर्टलही कुंभमेळा पोलिसांकडून बनवले जात आहे”.
त्याचबरोबर कुंभमेळ्यात सामूहिक भजन, गाणे, भंडारे यावरही संपूर्ण बंदी असेल. यात्रेकरुंना ऑनलाइन पास दिले जातील. यासाठी त्यांना www.haridwarkumbhmela2021.com या वेबसाइटवर नोंदणीसाठी अर्ज करणे आवश्यक ठरेल.
तसेच मोबाइलमध्ये आरोग्य सेतू अॅप असणे अनिर्वाय असणार आहे. तसेच जर यात्रेकरू नोंदणी न करता कुंभात दाखल झाले तर त्यांना प्रवेश दिला जाणार नाही. तर गंगेतील पवित्र स्नानासाठी फक्त २० मिनिटांचा वेळा दिली जाईल, अशी माहिती कुंभमेळाव्याच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कुंभमेळ्यासाठी अशी करा नोंदणी…
• कुंभमेळ्यात येण्यास इच्छुक यात्रेकरुंना सर्वप्रथम Www.haridwarkumbhmela2021.com या वेबसाइटवर अर्ज करावे लागेल.
• वरील लिंक उघडल्यानंतर उजव्या बाजूच्या Travel Registration वर क्लिक करा.
• त्यानंतर एक स्वतंत्र विंडो उघडेल, ज्यामध्ये हरिद्वार कुंभ – ऑनलाईन नोंदणी असे लिहिलेल असेल.
• त्यात एक फॉर्म उघडेल, ज्यात इच्छुक यात्रेकरूंना आपली वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
• सर्व वैयक्तिक माहितीच्या भरल्यानंतर शेवटी, आपला आयडी आणि कोरोना संक्रमित नसल्याचा अहवाल जोडावा लागेल.
• त्यानंतर यात्रेकरूना त्यांच्या प्रवासाचा तपशील पुढील भागात भरावा लागेल.
• हॉटेल / धर्मशाळेची माहिती द्यावी लागेल.
• संपर्क / पत्त्याची माहिती फॉर्मच्या पुढील भागामध्ये द्यावी लागेल.
• यानंतर तुम्हाला डिक्लरेशन विभागात माहिती द्यावी लागेल.
• फॉर्मच्या शेवटी सबमिट बटणावर क्लिक करून तुमची नोंदणी पूर्ण होईल.