मुक्तपीठ टीम
कानाला गोड वाटणारा चिमण्यांचा चिवचिवाट कमी झाला. नव्हे तो नसल्याचं चांगलंच खुपू लागलं. त्यामुळे चिमण्या कमी होत असल्याचं प्रत्येकाला पटू लागलं. सगळीकडे चिमण्यांसाठी वेगवेगळे प्रयत्न सुरु झाले आहेत. पण सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील आतार दाम्पत्याची निसर्ग सेवा वेगळीच. त्यांनी चिमणी आणि पक्षांना वरदान ठरणारा अनोखा उपक्रम राबवला आहे. टाकाऊपासून बनवली टिकाऊ घरटी बनवली असून घरासमोर फुलवेली, रोपं आणि झाडे लावली आहेत. त्यामुळे सभोतलाचं वातावरण निसर्गरम्य बहरलं आहे. त्यामुळे संपूर्ण घराच्या परिसरात चिमणी आणि पक्षांचा चिवचिवाट ऐकायला मिळतो. अन्न पाणी आणि निवारा उपलब्ध झाल्याने इथं चिमण्या आणि पक्षांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे.
इस्लामपूर येथील पक्षिमित्र आष्पाक आतार आणि त्यांच्या पत्नी शिक्षिका गुलजार आतार यांनी आपल्या अंगणामध्ये चिमण्यायांसह पक्षांसाठी अन्नपाण्याची तजवीज केली आहे. त्यांच्या निवाऱ्यासाठी छोटी घरटी तयार केली आहेत. आत्तार दाम्पत्यांनी राबवलेला हा उपक्रम चिमण्यांसह पक्षांना वरदान ठरत आहे. चिमणीसह अनेक पक्षी त्यांच्या अंगणामध्ये पहायला मिळत आहेत. वाढत्या उष्णतेमुळे अनेक पक्षी पाण्यावाचून तडफडत असताना पक्षीमित्र आष्पाक आत्तार यांनी पाणी पाजून त्यांना जीवदान दिले आहेत. त्यांच्या अंगणात लावलेल्या या घरट्यात पक्षी तर आहेतच शिवाय गच्चीवर लावण्यात आलेल्या वेली फुलांच्या कुंड्यांमध्ये ही पक्षांनी आपले बस्तान बसवले आहे. आत्तार यांनी टाकाऊ पासून टिकाऊ बनवलेली घरटी आकर्षक तर आहेतच शिवाय त्यावर लिहिलेला पक्षी, प्राणी तसेच निसर्ग संवर्धनाचा मजकूर अत्यंत हृदयस्पर्शी आहे.
समाजातील प्रत्येकाने हा उपक्रम राबवला तर नामशेष होणाऱ्या चिमण्या आणि पक्षी पुन्हा आपल्याला आपल्या अंगणात बागडताना दिसतील. आपल्या अंगणाचे परिसराचे सौंदर्य वाढेल पर्यायाने पर्यावरणाचे रक्षण होईल. आत्तार दाम्पत्यांच्या या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक करून अनुकरणही केले आहे.