मुक्तपीठ टीम
चीनमधील वाढत्या कोरोना प्रकरणामुळे जगाची चिंता वाढवली आहे. पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाने डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. इतर शहरांप्रमाणे चीनमधील सर्वात मोठं शहर शांघायमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. सोमवार ते शुक्रवार शांघायच्या पुडोंग आणि आसपासच्या भागात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यासोबतच शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचणी सुरू करण्यात आली आहे.
शांघायच्या स्थानिक सरकारनं सांगितलं की, सोमवार ते शुक्रवार शांघायच्या पुडोंग आणि आसपासच्या भागात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. हुआंगपु नदीच्या पश्चिमेकडील डाउनटाउन भागात शुक्रवारपासून लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जीवनावश्यक पदार्थ ऑनलाइन ऑर्डर करण्याचं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. अत्यावश्यक कार्यालयं वगळता इतर सर्व कार्यालयं बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याचं सरकारी आदेशात म्हटलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्टही बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे.
शांघायमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. २.६० कोटी लोकसंख्या असलेल्या शांघाय शहरातील अनेक भाग आधीच लॉकडाऊन अंतर्गत आहेत. तिथे लोकांच्या सतत कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. यापूर्वी शांघायमधील डिस्ने थीम पार्कही बंद करण्यात आले आहे. चीनमध्ये ५६ हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यापैकी बहुतेक जिलिनच्या उत्तर-पूर्व प्रांतात सापडले आहेत.