मुक्तपीठ टीम
राजकीय नेता म्हटलं की बडेजाव ठरलेलाच. त्यांचा थाट असा की ग्रामपंचायत सदस्याचा थाट पाहूनही अनेकदा त्याला आमदार झाल्यासारखंच वाटतं, असं भासतं. त्यांचं तसं तर मग मोठ्या नामांकित नेत्यांमधील अनेकांचं काय सांगावं! पण याच दिमाखाच्या स्पर्धेत एक नेता त्याच्या साधेपणामुळे लोकांची मनं जिंकत आहे. त्यांचं नाव खासदार संभाजीराजे छत्रपती.
स्वराज्याची राजधानी रायगडावरील काही महत्वाची विकास कामं त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारी समितीमार्फत सुरु आहेत. ठिगळ न वाटता रायगडाच्या स्थापत्याला साजेसं काम सुरु आहे. त्याची पाहणी ते नियमित रायगड पायी फिरत करत असतात. दुसरीकडे इतर अनेक जबाबदाऱ्याही पार पाडतात. त्यातच ते जळगाव जिल्ह्यात एका कार्यक्रमासाठी गेले असताना रात्री एक वाजता भुसावळ रेल्वे स्थानकावर गाडीसाठी थांबले होते. तेवढ्यात ते आल्याचं कळल्यानं शिवजयंतीची तयारी करत असलेल्या शिवप्रेमी तरुणांची तिथं दाटी झाली. सामान्य प्रवाशासारखा बसलेला हा राजघराण्यातील नेता पाहून त्या तरुणांना आनंद आणि अभिमान वाटला असणारच. पण संभाजी राजेंनीही फेसबुक पोस्टमध्ये या तरुणांशी गप्पा मारल्याने प्रवासा व कामाचा सारा क्षीण निघून गेल्याचं सांगितलं. तसंच जनतेच्या या प्रेमामुळे ऊर्जा लाभण्याचाही उल्लेख केला. असंच आपल्या सर्वच नेत्यांना वाटलं असतं तर?
खासदार संभाजी छत्रपतींची पोस्ट – १
२२ मार्च
जळगाव जिल्ह्यात एका कार्यक्रमानिमित्त गेलो असता, कार्यक्रम आटोपून मुंबईस निघण्यासाठी रात्री १ वाजता भुसावळ रेल्वे जंक्शनला पोहोचलो. रात्री दीड वाजता भुसावळ येथून निघणाऱ्या दूरांतो एक्स्प्रेसची वाट पाहत स्टेशनवर थांबलो होतो. तोच दुरून डोक्यावर भगवी टोपी परिधान केलेले १५-२० तरूण प्लॅटफॉर्मवर धावत येत असलेले दिसले. तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीची ते स्टेशन लगतच तयारी करत होते. कुठूनतरी मी स्टेशनवर आल्याची बातमी त्यांना कळताच ते धावतपळत मला भेटायला आले होते. ट्रेन यायला अजून अर्ध्या तासाचा अवधी होता. त्यामुळे या सर्व शिवभक्तांचा उत्साह पाहून मीदेखील तिथेच त्यांच्यासोबत बसून वेगवेगळ्या विषयांवर भरभरून गप्पा मारल्या.
दिवसभराचा प्रवास व कामाचा जो थोडा शीण आला होता, तो या निस्सीम शिवभक्तांसोबत वेळ घालवल्यामुळे कुठल्या कुठे निघून गेला. त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह व आनंद पाहून मलाही समाधान वाटले. या छोट्या छोट्या गोष्टींतून दिसणारे जनतेचे माझ्यावरील प्रेम, हेच मला सदैव कामात राहण्याची ऊर्जा देत असते…
खासदार संभाजी छत्रपतींची पोस्ट – २
१८ मार्च
आज दुर्गराज रायगडास भेट दिली. स्वराज्यसंकल्प श्री शहाजीराजांची जयंती देखील आज आहे. या भारतभूमीला परकियांच्या जोखडातून मुक्त करून भूमिपुत्रांचे स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न शहाजीराजांनी पाहिले व छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गराज रायगडावर राज्याभिषेक करवून घेऊन हे स्वप्न साकार केले. भारतभूमीने स्वातंत्र्याचा पहिला सूर्य हा रायगडावरूनच पाहिला .
भारताच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व लाभलेल्या दुर्गराज रायगडाचे जतन, संवर्धन करण्याचा ध्यास मी घेतलेला आहे. माझ्या राज्यसभा सदस्यत्वामुळे गेल्या सहा वर्षांत रायगडसह महाराष्ट्रातील इतरही गडकोटांच्या जतन संवर्धनाबाबत मी माझ्या खासदारकीची संपूर्ण ताकद वापरून अनेक अडचणींवर मात करू शकलो, याचा मला आनंद आहे. रायगड असो अथवा इतर गडकोट असोत, त्यांचे जतन व संवर्धन करण्यात नैसर्गिक आपत्तीपासून ते प्रशासकीय व्यवस्थेपर्यंत अनेक अडचणी असतात. संसद सदस्य असल्यामुळे या लोकशाही साधनाचा खुबीने वापर करत यातील अनेक अडचणींवर मात करण्यात मी यशस्वी होऊ शकलो. स्वातंत्र्याचे प्रेरणास्थान व शिवरायांची जिवंत स्मारक असणारे महाराजांचे गडकोट यांच्या संवर्धनासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहील.
पाहा व्हिडीओ: