मुक्तपीठ टीम
सिडको महामंडळातर्फे, विमानतळ प्रकल्पबाधितांना पुष्पक नगर या पुनर्सवन आणि पुन:स्थापना क्षेत्रात वाटपित करण्यात आलेल्या भूखंडांकरिता पूरक चटई क्षेत्र निर्देशांकासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्याकरिता प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करण्यात आली आहे.
सिडकोतर्फे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांकरिता सामाजिक आणि भौतिक पायाभूत सुविधांनी परिपूर्ण असणारा पुष्पक नगर नोड विकसित करण्यात येत आहे. पुष्पक नगर नोडमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसन आणि पुन:स्थापनेकरिता सिडकोकडून भूखंड वाटपित करण्यात आले आहेत.
पुष्पक नगरचा विकास हा नगर विकास विभागाने २ डिसेंबर २०२० पासून अंमलात आणलेल्या एकत्रिकृत विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीनुसार नियंत्रित होत आहे. युडीसीपीआर मधील तरतुदींनुसार सिडकोने मूळ १.५ चटई निर्देशांकाव्यतिरिक्त पूरक चटई क्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय केला आहे. आपल्या भूखंडांकरिता पूरक चटई क्षेत्र निर्देशांक ना-हरकत प्रमाणपत्रे जलद गतीने देण्यात यावीत, अशी विनंती विमानतळ प्रकल्पबाधितांनी सिडकोला केली होती.
या विनंतीस सकारात्मक प्रतिसाद देत सिडकोकडून पूरक चटई क्षेत्र निर्देशांकाकरिता ना-हरकत प्रमाणपत्रे प्रदान करण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. यानुसार, मुख्य भूमी व भूमापन अधिकारी विभागाकडून विहित नमुना तयार करण्यात आला आहे. सिडकोच्या वित्त विभागाच्या मंजुरीनंतर, पूरक चटई क्षेत्र निर्देशांक ना-हरकत प्रमाणपत्राकरिता केलेल्या विहित नमुन्यातील अर्जांवर प्रक्रिया करण्यात येईल. त्यानंतर अर्जदाराच्या मागणीचा विचार करून व्यवस्थापनाकडून त्याकरिता मंजुरी देण्यात येईल. संपूर्ण प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येईल. सिडकोतर्फे पूरक चटई क्षेत्र निर्देशांक ना-हरकत प्रमाणपत्र देण्याकरिता प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यात आल्यामुळे पुष्पक नगर नोडच्या विकासास गती मिळणार आहे.