मुक्तपीठ टीम
देशातील सध्या तरूण मंडळी स्टार्टअपकडे वळत आहे. स्वत:चे काहीतरी अस्तित्व निर्माण करण्यासाठीचा आणि तंत्रज्ञानाच्या जगात प्रगती करण्याचा हा प्रयत्न आहे. देशात स्टार्टअप्सची संख्या वाढवण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. यामुळेच भारतात स्टार्टअप कंपन्यांची संख्या दरवर्षी १० टक्क्यांनी वाढत आहे.
नॅसकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर इंटरनेट ऑफ थिंग्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव मल्होत्रा यांनी सांगितले की, बहुतेक स्टार्टअप कंपन्या ऍप्लिकेशनच्या क्षेत्रात आहेत तर, बर्याच स्टार्टअप कंपन्या सॉफ्टवेअर सेवेवर आधारित आहेत. ते म्हणाले की, “देशात स्टार्टअप कंपन्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. दरवर्षी १० टक्के नवीन कंपन्या सामील होत आहेत. तसेच, संशोधनाच्या मुख्य क्षेत्रांमध्ये स्टार्टअप तयार करण्याची गरज आहे. भारत संपूर्ण जगात तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम आहे. देशातील नवीन स्टार्टअप कंपन्यांची संख्या २०२१-२२ मध्ये १४ हजारांपेक्षा जास्त झाली आहे, तर २०१६-१७ या आर्थिक वर्षात ही संख्या केवळ ७३३ होती.”
युनिकॉर्नच्या संख्येत सतत वाढ
- भारतात आणखी युनिकॉर्न म्हणजे १ बिलियन डॉलर पेक्षा जास्त मूल्य बनवले जात आहेत.
- २०२१ मध्ये, ४४ भारतीय स्टार्टअप्सनी युनिकॉर्नचा दर्जा प्राप्त केला आहे. अशा प्रकारे देशातील युनिकॉर्नची संख्या ८३ वर गेली आहे.
- यासह या कंपन्यांच्या एकूण मालमत्तेत १०६ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. स्टार्टअप्सच्या माध्यमातून १४ लाख लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या आहेत.
येत्या २०२६ वर्षापर्यंत देशात एक अब्ज स्मार्टफोन यूजर्स
- २०२६ पर्यंत भारतात एक अब्ज स्मार्टफोन यूजर्स असतील. ग्रामीण भागात इंटरनेट सुविधेची क्षमता असलेल्या मोबाइल फोनच्या विक्रीत वाढ झाल्याने स्मार्टफोन यूजर्सची संख्या वाढणार आहे.
- २०२१ पर्यंत भारतात १.२ अब्ज मोबाईल फोन यूजर्स होते. यापैकी ७५० दशलक्ष लोक स्मार्टफोन वापरतात.
- ग्रामीण भागातील स्मार्टफोन यूजर्सची संख्या २०२१ ते २०२६ पर्यंत वार्षिक आधारावर सहा टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.