मुक्तपीठ टीम
आंतरराष्ट्रीय महिला दिन नुकताच साजरा झाला. त्यानिमित्त महिलांच्या कर्तृत्वगाथा मांडणाऱ्या अनेक पोस्ट व्हायरल झाल्या. अशीच एक हिंदीतील पोस्ट समोर आली. ती मुक्तपीठच्या वाचकांसाठी मांडणं आवश्यक वाटतं. कारण आजवर वाचनात न आलेली अशी आहे. तसंही ज्या भारतीय महिलांनी केलेली कामगिरी आणि त्यांचे योगदान आठवले तर ते समाजासाठी एक उदाहरण ठरेल. आज भारतात अनेक महिला वैमानिक आहेत ज्या विमानातून फायटर जेटपर्यंत उड्डाण करतात पण भारतातील पहिली महिला पायलट कोण आहे हे माहित आहे का? धाडसी साहस दाखवणाऱ्या सरला ठकराल या पहिल्या भारतीय महिला पायलट होत्या.
सरला ठकराल यांची जीवन यात्रा
- सरला ठकराल यांचा जन्म ८ ऑगस्ट १९१४ रोजी ब्रिटिश भारतात झाला.
- सरला या १६ वर्षांच्या असताना त्यांचे लग्न पीडी शर्मा या प्रशिक्षित पायलटशी झाले होते.
- सरला यांना त्यांच्या पतीने उड्डाणासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे लग्नानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळूनही सरला यांनी आपली स्वप्ने जिवंत ठेवली.
- सरला ठकराल यांना सासरच्या मंडळींचे सहकार्य लाभले
- सरला ठकराल यांच्या पतीशिवाय, त्यांच्या कुटुंबात नऊ पायलट होते. सरला यांच्या पतीला पहिले इंडियन एअर मेल पायलटचा परवाना मिळाला. ते कराचीहून लाहोरला जायचे.
- सरला ठकराल या लाहोर फ्लाइंग क्लबच्या सदस्याही होत्या. जेव्हा सरलायांचे प्रशिक्षण संपले आणि आवश्यक उड्डाणाचे तास पूर्ण झाले, तेव्हा सरला यांनी एकट्याने उड्डाण करावे अशी त्यांच्या प्रशिक्षकांची इच्छा होती.
- फ्लाइंग क्लबमधील एक कारकून वगळता त्यांच्यासोबत असलेल्या एकाही सदस्याने यावर आक्षेप घेतला नाही.
विमानाचा परवाना मिळविणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या
सरला ठकराल या एक हजार तासांची फ्लाइट पूर्ण करणारी पहिली परवानाधारक भारतीय महिला होत्या. सरला यांच्या सासऱ्यांनीही तिला साथ दिली, पण पुढे १९३९ मध्ये जेव्हा सरला व्यावसायिक पायलटच्या परवान्यासाठी खूप मेहनत घेत होती तेव्हा दुसऱ्या महायुद्धामुळे तिचे प्रशिक्षण खंडित करावे लागले. याच दरम्यान सरला ठकराल यांच्या पतीचा विमान अपघातात मृत्यू झाला. सरला त्यावेळी अवघ्या २४ वर्षांच्या होत्या. या घटनेनंतर त्यांनी पायलट होण्याचे स्वप्न सोडून दिले आणि भारतात परतल्या. येथे त्यांनी मेयो स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला आणि चित्रकला शिकल्या आणि फाइन आर्टमध्ये डिप्लोमा मिळवला.
सरला ठकराल एक उद्योजिका
१९४७ मध्ये भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा सरला आपल्या दोन मुलींसह दिल्लीला राहायला गेल्या. एका वर्षानंतर त्यांनी पीपी ठकराल नावाच्या व्यक्तीशी लग्न केले. सरला यांनी आपले जीवन कपडे आणि दागिने डिझाईन करण्याच्या दिशेने सुरू केले आणि जवळजवळ २० वर्षे कुटीर उद्योगाशी संबंधित होत्या. देशातील होतकरू महिला पायलटनेही एका व्यावसायिकाची भूमिका अतिशय चोख बजावली. १५ मार्च २००८ रोजी त्यांचे निधन झाले. पण त्यांचे कर्तृत्व, साहस आणि संघर्षाची कहाणी प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणादायी ठरली.