मुक्तपीठ टीम
डोंगरी येथील निरीक्षण गृह व बालगृहात राहणाऱ्या मुलांसाठी कपडे उपलब्ध व्हावेत या उद्देशाने राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्यावतीने एक अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामाध्यमातून याठिकाणी कपडे दान कक्षाची स्थापना केली असून या कक्षात जनतेने कपडे दान करून सहकार्य करावे असे आवाहन महिला व बालविकास विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
डोंगरी येथील निरीक्षण गृह व बालगृहात अनेक अल्पवयीन मुलांचे वास्तव्य असते. अशा मुलांना सामाजिक, आर्थिक, मानसिक आधार देण्याची गरज असून याच भावनेतून म्हणून राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून प्रधान सचिव आय ए कुंदन यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगरीतील निरीक्षण गृह व बालगृहात ‘कपडे दान कक्ष’ उभारण्यात आला आहे. जेणे करून संस्थेतील ‘कपडे दान कक्षात’ जाऊन जनतेने आपल्यासोबत आणलेले स्वच्छ व नीटनेटके कपडे याठिकाणी ठेवावेत. त्यानंतर या कक्षातील आपल्या आवडीनुसार आणि आकारानुसारचे कपडे मुले स्वत: निवडतील आणि परिधान करू शकतील. शक्यतो जनतेने नवीन कपड्यांना प्राधान्य द्यावे अशी ही विनंती करण्यात आली आहे.
राज्याचा महिला व बाल विकास विभाग हा बालक जीवन, सुरक्षा, विकास सक्षमीकरण आणि सहभाग समग्रपणे व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. डोंगरी येथील निरीक्षण गृह व बालगृहात राहणाऱ्या मुलांना चांगल्या सुविधांसह चांगले कपडे परिधान करता यावेत म्हणून या मुलांसाठी स्वच्छ आणि नीट नेटके कपडे जनतेने दान करून त्यांच्यासाठी आधारवड बनावे ही यामागची भावना आहे.