मुक्तपीठ टीम
कामगार विभागातर्फे इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील बांधकाम कामगारांना मंडळामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांचे लाभ घेण्याकरिता जास्तीत जास्त कामगारांनी नोंदणी करावी. तसेच असंघटीत क्षेत्रातील जसे की. रिक्षावाले, फेरीवाले, भाजी व फळ विक्रेते, घरकाम करणा-या महिला कामगार यासारख्या विविध ३०० उद्योग व व्यवसायातील कामगारांनीही केंद्र सरकारच्या ई-श्रम पोर्टलद्वारे जास्तीत जास्त नोंदणी करावी असे आवाहन कामागार विभागाने केले आहे.
केंद्र शासनाच्या श्रम व रोजगार मंत्रालयातर्फे दि. ०७ ते १३ मार्च २०२२ या कालावधीत आयकॉनिक सप्ताह साजरा करण्याबाबत सह सचिव व महानिदेशक श्रम कल्याण श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार यांचेकडून निर्देश प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार कामगार विभागामार्फत दि. ०७ ते १३ मार्च २०२२ या कालावधीत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत विविध ३२ कल्याणकारी योजनांची माहिती देण्याकरिता मुंबई उपनगर कार्यक्षेत्रातील बांधकामाच्या ठिकाणी तसेच असंघटीत कामगारांकरिता प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना व ई-श्रम पोर्टलव्दारे नोंदणी / कार्ड वाटप इत्यादी करीता विशेष कार्यक्रम आयोजित करण्याबाबत जनजागृती या कालावधीत करण्यात येणार आहे.
असंघटीत क्षेत्रातील कामगारांच्या ई-श्रम पोर्टलवर नोंदणीकरिता १६ ते ५९ वर्ष या वयोगटातील कामगारांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील नागरी सुविधा केंद्रामध्ये संपर्क साधून नोंदणी करावी. ही नोंदणी विनाशुल्क आहे.
बांधकाम कामगारांच्या नोंदणीकरिता नोंदणी शुल्क रु. २५/- व दरमहा वर्गणी रु. १/- फक्त अशाप्रकारे असून याकरिता मंडळाच्या www.mahabocw.in या संकेतस्थळावर १८ ते ६० वर्ष या वयोगटातील बांधकाम कामगारांनी अर्ज करावेत. संकेतस्थळावर अर्ज सादर करताना मागील एका वर्षामध्ये ९० दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याबाबतचे मालकाकडील/ ठेकेदाराकडील/ कंत्राटदाराकडील प्रमाणपत्र तसेच वयाबाबतचा रहिवासी पुरावा बॅक पासबुकची छायाप्रत आणि ओळखपत्र पुरावे जोडणे आवश्यक आहे.
या कालावधीत मुंबई उपनगर जिल्ह्यातील विविध कार्यरत बांधकामाच्या ठिकाणी कामगार कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी तसेच कामगार सुविधा केंद्रातील फिल्ड ऑफीसर व कर्मचारी यांच्या सहाय्याने बांधकाम कामगारांची नोंदणी करणे, ज्या कामगारांची नोंदणी झालेली आहे अशा कामगारांचे नूतनीकरण करणे तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक तसेच आरोग्यविषयक विविध ३२ कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत, त्याबाबतची माहितीही बांधकाम क्षेत्रातील कामगारांना करुन देण्यात येणार आहे.
या कालावधीत आयकॉनिक सप्ताह साजरा करीत असताना ज्या ठिकाणी कामगारांचा मोठ्या प्रमाणे वावर आहे तसेच गर्दीच्या ठिकाणी ई श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याबाबत व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या योजनाची तसेच प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची जनजागृती होण्याकरिता या योजनांचे डिजटिल बोर्ड, फ्लेक्स, बॅनर तसेच पोस्टर इत्यादी प्रकारच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. दि. ०७ ते १३ मार्च २०२२ या कालावधीतसाजरा करण्यात येणाऱ्या आयकॉनिक सप्ताहाकरिता स्थानिक लोक प्रतिनिर्धीचाही सहभाग आणि मदत घेण्यात येणार आहे, असे कामगार उपायुक्त मुंबई उपनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.