डॉ.गणेश नानासाहेब गोळेकर
या होतकरू तरुणाने लिहिले आहे. आजच्या काळात मराठा समाजाची झालेली दशा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. संस्थाचालक, राजकारणी, कारखानदार हीच फक्त मराठा समाजाची ओळख नसून अनेक एकर शेती असलेला बहुतांश समाज अल्पभूधारक, गुंठाधारक, शेतमजूर, हमाल, वेटर,मोलकरिण, मिस्तरी, डब्बेवाला, पेपर वाटणारा, ऊसतोड कामगार देखील केंव्हाच बनलाय. पाटलांची पाटीलकी विरली आहे, नव्हे ती नावालाच उरली आहे. तर देशमुखांची देशमुखी केंव्हाच नष्ट झाली आहे. त्यांच्या गढीच्या पाऊलखुणा देखील नामशेष होत आहेत. काळाप्रमाणे न बदलल्याने तो आणखी दुःखाच्या खाईत लोटला जात आहे. इतर समाजाला सोबत घेऊन चालणारा आहे,हे त्याने आपल्या वागण्यातून, कृतीतून वेळोवेळी सिद्ध केलेलेच आहे. वंचित, मागासलेल्यांसाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे त्याने मोठा भाऊ म्हणून समर्थनच केले आहे. शेतीचे नापिकी,सतत पडणारा दुष्काळ,निसर्गाचा लहरीपणा, पारंपारिक प्रथांचे जोखडं यामुळे शेती हा आतबट्ट्याचा व्यवहार बनला आहे. त्याने पिकवलेल्या मालाला मातीमोल भाव मिळत आहे. एक तर पिकतं नाही आणि पिकलेचं तर त्याला भाव मिळेलच याची शाश्वती नाही.
प्रतीक्षेत असलेले आरक्षण, आरक्षणाचे होत असलेले राजकारण, ५०% च्या आतील आरक्षण द्यायला राजकीय पक्षात जणू स्पर्धाच लागलेली आहे. ५०% च्या आतील आरक्षण द्यायला राज्य सरकार तयार नाही, तर ५० %च्या वरचे मा. न्यायालयाला मान्य नाही. केंद्रसरकार आरक्षणाची मर्यादा वाढवायला तयार नाही. त्यामुळे समाजाची गोची निर्माण झालेली आहे. आरक्षणावर केंद्र व राज्य सरकारांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिका वादातीत आहेत. मराठा आंदोलकांना शासनाकडून सापत्नभावाची वागणूक मिळत आहे. न्यायाच्या प्रतीक्षेत असलेली कोपर्डीची निर्भया, त्यानिमित्ताने निघालेले जगाला आदर्श असे ५८ मराठा क्रांती मूक मोर्चे,त्या मोर्चासाठी स्वतःहून पाळलेली आदर्श संहिता, लाखोंच्या गर्दीतही रुग्णवाहिकेस रस्ता देण्याचा प्रामाणिक वसा, मोर्चे संपल्यानंतर स्वयंसेवकांनी रस्त्यावर केलेली स्वच्छता, लाखोंची गर्दी असूनही कोणाच्याही केसाला धक्का सुद्धा नाही किंवा कोणालाही कोणता त्रास झाला नाही, कोणत्याही सरकारी किंवा खासगी मालमत्तेचे नुकसान नाही, भारतातीलच नव्हे तर जगातील प्रमुख वृत्तपत्रांनी या मोर्चाचे कौतुक केले. जगातील प्रसारमाध्यमांनी त्याला प्रसिद्धी दिली. मात्र यातून मिळाले काय तर मूळ प्रश्न अनुत्तरीतच आहेत. मराठा समाजाच्या प्रश्नावर राजकीय जोडे सोडून एकत्र न येणारे मराठा नेते, न्यायालयीन वादात अडकलेले आरक्षण, न्यायालयीन कचाट्यात सापडलेले अरबी समुद्रातील शिवरायांचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे स्मारक, शेतीमालाला हमीभावासाठी झगडणारे शेतकरी, शिक्षणासाठी महत्त्वाचा असलेला मराठा विद्यार्थी – विद्यार्थिनींचा जिल्हास्तरावरील वसतिगृहाचा प्रश्न, वास्तविक पाहता प्रत्येक तालुक्याच्या स्तरावर अशी वसतिगृहे होणे आवश्यक होते, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे सक्षमता, सारथी संस्थेच्या भविष्याचा वेध, प्रत्येक जातींची सद्यस्थिती, त्यांच्यातील प्रगती वा अधोगती, कोणती जात मागास आहे व कोणती अतिमागास आहे यांचा अद्ययावत डेटा गोळा करण्यासाठी जातीनिहाय जनगणनेची आवश्यकता, बदलत्या काळानुसार अट्रॉसिटी कायद्यात सुधारणा, महापुरुषांचा होत असलेला अवामान, विशेषतः मराठ्यांच्या इतिहासाचे होत असलेले विकृतीकरण व ते थांबवण्यासाठी कडक कायद्याची आवश्यकता, इतर समाजाला जो न्याय केंद्र-राज्य सरकार देते, तो न्याय मराठा समाजाला का नाही हे अनेक न्यायालयीन निवाड्याची उदाहरणे देऊन त्यांनी विशद केले आहे. मराठे युद्धात जिंकतात व तहातही जिंकतील अशा आशावादांसह मराठा क्रांती मोर्चाच्या विविध मागण्यांना प्रखरतेने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.
फक्त परिस्थितीला दोष देऊन चालणार नाही, तर समाजाची बलस्थाने शोधून समाजाची कष्ट करण्याची, मेहनत घेण्याची वृत्ती अधोरेखित केलेले आहे. पुढील पिढ्या शिकवून नोकरी,उद्योग-व्यवसायात आणता आल्या तर गतवैभव निश्चित प्राप्त करता येईल, असा विचार त्यांनी मांडलेले आहेत. आशय ताकदवान असेल तर पुस्तक सुद्धा बदलासाठी कारणीभूत ठरू शकेल असा दुर्दम्य आशावाद त्यांनी बाळगलेला आहे. सदर पुस्तक अभ्यासकांना, मराठा आंदोलकांला व युवा पिढीला निश्चितच मार्गदर्शक ठरेल.
सर्वसामान्यालाही हे पुस्तक वाचता यावे,यासाठी त्याचे स्वागत मूल्य ५१/ रुपये ठेवण्यात आलेले आहे.ज्यांना या पुस्तकाची प्रत पाहिजे, त्यांनी ८२३७११५३०३ या फोन पे वर पेमेंट करून त्याचा स्क्रीन शॉट व संपूर्ण पत्ता व्हाट्सअप वर मेसेज पाठवावा.
डॉ.गणेश नानासाहेब गोळेकर
मराठा सेवक