मुक्तपीठ टीम
महिलांचा उत्साह हा नेहमीच भन्नाट असतो. कोणतीही चांगली गोष्ट करण्यासाठी त्या नेहमीच पुढाकार घेतात. यशस्वी करूनही दाखवतात. नव्या चांगल्या परंपरा घडवतात. असंच एक मुंबईतील म्हाडा पोलीस लाईनचं महिला मंडळ आहे. त्यांचा उत्साह हा वेगळाच आहे. महिला दिनानिमित्त त्या दरवर्षी एकत्र जमतात आणि सेलिब्रेशनची जोमानं तयारी करतात. फक्त महिला दिनच नव्हे तर असे अनेक कार्यक्रम आहेत जे त्या त्यांच्या १० ब इमारतीच्या पटांगणात करत असतात. यावेळी सेलिब्रेशनचं निमित्त होतं ते महिला दिन.
पोलीस लाईनमधील या महिला म्हटलं की, त्यांच्यातील आपुलकी तर दिसतेच पण निवृत्तीनंतरचा एकोपाही १० ब मध्ये पाहायला मिळतो. गेल्या २ वर्षात १० ब मधील अनेक कुटुंब निवृत्तीनंतर वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झाले. कोणी गावी गेलं, कोणी मुंबईबाहेर तर कोणी आसपासच्या परिसरात स्थायिक झाले. आपल्या आयुष्याचा मोठा काळ या ठिकाणी घालवल्यानंतर, म्हातारपणाला आपल्या पोलीस कुटुंबापासून दूर जावं लागतं. इथून जाताना अगदी उर भरून येतं. पण नाइलाजच हा. प्रत्येक पोलीस रहिवाश्यांवर ही वेळ येतेच येते. पण मन आपल्या पोलीस लाईनशी जुळलेलंच राहतं.
पोलीस लाईनमधील महिला सांगतात की, “आम्ही इथे असताना किंवा येथून लांब असताना या क्षणाची वाटच पाहत असतो की, आम्ही कधी आमच्या १० ब इमारतीच्या कुटुंबाला भेटत आहोत. आणि ही संधी अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांमार्फत आम्हाला मिळते आणि आम्ही आवर्जून तिथे हजेरी लावतो.” म्हाडामध्ये कार्यक्रम म्हटला की सर्व अगदी आतूरच असतात. निवृत्त झालेल्या १० ब च्या पोलीस कुटुंबांचीही येथे नेहमीच उपस्थिती असते. आपुलकीचं त्यांचं नातं आहेच तसं!