मुक्तपीठ टीम
गुजरातच्या सूरतमध्ये एक खळबळजनक प्रकार घडला आहे. हृदयविकार, मधुमेह आणि अन्य आजार असलेल्या एका ६३ वर्षीय व्यक्तीने सातवे लग्न केलं आहे. सहाव्या पत्नीने शरीर संबंधांना नकार दिल्याने गरज म्हणून सातवे लग्न केल्याचा दावा या व्यक्तीनं केला आहे.
सुरत जिल्ह्यातील कपलेठा गावात श्रीमंत शेतकरी अयूब डिगिया राहतात. सप्टेंबर २०२० मध्ये त्यांनी सहावे लग्न केले होते. लग्नाच्या दोन महिन्यांनी डिसेंबरमध्ये दोघे वेगळे झाले. अयूबने दिलेल्या माहितीनुसार, या सहाव्या पत्नीने त्याच्याशी शरीर संबंध ठेवण्यास नकार दिला. कोरोनाचे कारण सांगून ती वेगळी झोपत होती. त्याला हृदयविकार, मधुमेह आणि अन्य आजार आहेत. पण तो अधिकारवाणीने सांगतो की, त्याला एका अशाच पत्नीची गरज आहे जी त्याच्यासोबत संबंध ठेवू शकेल.
अयूब याची पहिली पत्नी जिवंत आहे. तिला २० ते ३५ वर्षांची मुले आहेत. ती याच गावात राहते. अयूबने सहावे लग्न ४२ वर्षीय महिलेसोबत केले. या सहाव्या पत्नीला लग्न केल्यानंतर आधीच्या पाच लग्नांची माहिती मिळाली. गेल्या आठवड्यात तिने महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आधीच्या लग्नांबाबत अंधारात ठेवून फसवणूक करत लग्न केल्याचा आरोप तिने केला आहे. आता तिला सोडून अयूब सातव्या पत्नीसोबत राहत आहे. तिला गावकऱ्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला की सांगितले की, अयूब असाच काही काळ नव्या लग्नातील नव्या पत्नीसोबत राहतो आणि मग सोडून देतो.
डिसेंबरमध्ये अयूबने सहाव्या पत्नीला तिच्या बहिणीच्या घरी सोडले. तसेच बाहेर जात असल्याचे त्यांना सांगितले. परत आल्यानंतर तिला घेऊन जाण्याचे आश्वासन दिले. मात्र, तो परत आलाच नाही. चौकशी केल्यानंतर त्याने सातवे लग्न केल्याचे समोर आले, असे महिलेचे वकिल चंद्रेश जोबनपुत्र यांनी सांगितले. आधीच्या सर्व बायकापासून वेगळे होण्याचे कारण विचारता डिगियाला समाधानकारक उत्तर देता आले नाही.