मुक्तपीठ टीम
रशिया-युक्रेन युद्धामुळे महागाईचा भडका वाढला आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सतत वाढत आहेत. युक्रेन-रशिया संघर्षाचा भारतावरही परिणाम होत आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांदरम्यान गेल्या चार महिन्यांपासून स्थिर ठेवण्यात आलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १२ रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणूक काळात केंद्रातील सत्ताधारी भाजपाविरोधात असंतोष भडकू नये, यासाठी निवडणूक कालावधीत इंधन दर जसे असतात तसे ठेवण्यात येतात. त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाशी स्थानिक इंधन दरांची घालण्यात आलेली सांगड ऑइल कंपन्याही विसरून जातात. मात्र, निवडणुकांची गरज भागताच पुन्हा सर्व घट भरून काढण्यासाठी मोठी दरवाढ केली जाते. आताही तशी भीती व्यक्त केली जात आहे.
आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या अहवालात म्हटले की, गेल्या दोन महिन्यांत जागतिक कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे सरकारी तेल कंपन्यांचे मोठे नुकसान होत आहे. देशांतर्गत तेल कंपन्यांना केवळ खर्च भरून काढण्यासाठी लवकरात लवकर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लिटर किमान १२ रुपयांनी वाढवाव्या लागतील. तेल कंपन्यांसाठी मार्जिन समाविष्ट केल्यानंतर किंमती १५ रुपयांनी वाढवण्याची गरज आहे.
भारत आपल्या गरजेच्या ८५ टक्के कच्च्या तेलाची आयात करतो. त्यामुळे देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर जागतिक कच्च्या तेलाच्या किमतींचा प्रभाव पडतो.
…तर मार्जिन १०.१ रुपयांनी खाली येऊ शकते
- तसेच ब्रोकरेज कंपनी जे.पी. मॉर्गन यांनी एका अहवालात म्हटले आहे की, राज्यातील विधानसभा निवडणुका पुढील आठवड्यात संपतील.
- त्यानंतर दररोज इंधनाचे दर वाढू शकतात, असा अंदाज आहे.
- अहवालानुसार, ३ मार्च २०२२ रोजी वाहन इंधनाचे विपणन नफा उणे ४.९२ रुपये प्रति लिटर इतके होते.
- चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत आतापर्यंत ते १.६१ रुपये प्रति लिटर आहे.
- इंधनाच्या सध्याच्या आंतरराष्ट्रीय किमतीवर, निव्वळ नफा १६ मार्च रोजी उणे १०.१ रुपये प्रति लिटर आणि १ एप्रिल रोजी १२.६ रुपये प्रति लिटरपर्यंत खाली येऊ शकते.
नऊ वर्षात पहिल्यांदाच कच्चा तेलाच्या किंमती वाढल्या
- आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती गुरुवारी नऊ वर्षांत पहिल्यांदाच १२० डॉलर प्रति बॅरलच्या वर वाढल्या.
- शुक्रवारी १११ डॉलरवर किंचित कमी झाल्या, पण किंमत आणि किरकोळ दरांमधील अंतर वाढले आहे.
- पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अॅनालिसिस सेल (पीपीएसी) कडून मिळालेल्या माहितीनुसार, ३ मार्च रोजी भारतातील कच्च्या तेलाची खरेदी प्रति बॅरल ११७.३९ डॉलरपर्यंत वाढली, जी २०१२ नंतरची सर्वाधिक आहे.
- तर नोव्हेंबर २०२१ च्या सुरुवातीला कच्च्या तेलाची भारतीय बास्केट किंमत प्रति बॅरल सरासरी ८१.५ डॉलर होती.