मुक्तपीठ टीम
आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं आहे. अधिवेशनाची सुरुवातच वादळी ठरली. सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी सुरु होती. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांविषयी केलेल्या एका विधानाचा निषेध करण्यासाठी राज्यपालांच्या भाषणावेळी सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे राज्यपालांना अवघ्या दोन मिनिटांमध्ये आपलं भाषण आटोपतं घ्यावं लागलं. त्यामुळे आघाडी सरकारकडून राज्यपाल्यांचा निषेध करण्यात येत आहे.
सभागृहात नेमकं काय घडलं?
- राज्यपाल विधिमंडळात दाखल झाल्यानंतर अधिवेशनाला सुरुवात करताच आघाडी सरकारकडून जोरदार घोषणाबाजी सुरु झाल्या.
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या एका विधानामुळे त्यांचा निषेध करण्यासाठी सत्ताधारी आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली.
- त्यांनी आपल्या भाषणात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं नाव घेतल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून अधिकच घोषणाबाजी करण्यात आली.
- महाविकास आघाडीच्या आमदारांनी घोषणा देण्यास सुरुवात केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले मात्र त्यानंतर पुन्हा भाजप आमदारांनी घोषणा देण्यास सुरुवात केली.
- त्यानंतर राज्यपाल अभिभाषण सोडून निघून गेले.