मुक्तपीठ टीम
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मुंबईतील मालवणी पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे आमदार पुत्र नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दिशा सालियनच्या मृत्यूनंतर तिच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप दोघांवर आहे. त्यांनी त्या वक्तव्याचा दिशाच्या पालकांच्या विनवणीनंतरही पुनरुच्चार केल्यानं महिला आयोगानं गंभीर दखल घेतली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आपल्या मृत मुलीची बदनामी केल्या प्रकरणी दिशाच्या पालकांनी आक्षेप घेतला होता. दिशा सालियनच्या पालकांनी नारायण राणेंच्या विधानांना गंभीर आक्षेप घेतला होता. त्यांनी मेलेल्या मुलीची विनाकारण बदनामी केली होती. त्यानंतर सालियनच्या पालकांनी मालवणी पोलिसांकडे जाऊन राणेंविरोधात एफआयआर दाखल केला.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे याविषयी तक्रार नोंदवली होती. त्यानंतर महिला आयोगाच्या दोन सदस्यांनी दिशा सालियनच्या घरी जाऊन तिच्या पालकांचे जबाब नोंदवले. त्या चौकशीनंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने सालियनच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांना नोटीस बजावली आणि दोन दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले. आयोगाने तिचा शवविच्छेदन अहवाल आणि एफआयआरची प्रत आणि साक्षीदारांचे जबाब इत्यादी कागदपत्रेही मागवली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवल्याचे मानले जाते.