मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयाने ईडी कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. पण सुनावणीच्यावेळी ईडीकडून अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग आणि मलिक यांच्याकडून अमित देसाई यांनी केलेला युक्तिवाद महत्वाचा आहे. त्यातही देसाई यांनी मांडलेला कायदा नंतर अस्तित्वात आला मग तो आधीच्या घटनेसाठी कसा वापरला, हा मुद्दा बुधवारी कोठडी टाळण्यासाठी उपयोगी ठरला नसला तरी वरिष्ठ न्यायालयात मात्र तो मलिकांसाठी उपयोगी ठरण्याची शक्यता आहे, असे मत कायदे क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.
दाऊद, हसिना, इक्बाल, बॉम्बस्फोट आरोपी आणि जमीन!
- अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी ईडीसाठी युक्तिवाद केला.
- कुर्ला एलबीएस मार्गावर गोवावाला कंपांऊड येथील जमीन नवाब मलिक यांनी माफिया डॉन दाऊद इब्राहीम याच्याशी संबंधित व्यक्तींकडून घेतल्याचा दावा ईडीचे वकील अनिलसिंह यांनी केला.
- दाऊदची बहीण हसीना पारकरचाही या प्रकरणाशी संबंध असल्याचे अनिलसिंह यांनी सांगितले.
- दाऊदचा भाऊ इक्बाल पारकरला ईडीने दोन दिवसांपूर्वीच अटक केली आहे. मुनिरा आणि मुरियम यांची ही वडिलोपार्जित मालमत्ता होती.
- वडिलांच्या निधनानंतर त्यांचीच यावर मालकी होती.
- हसीना पारकरशी संबंधित सलीम पटेल याला या मालमत्तेमधील भाडेकरू काढण्याचे अधिकार या दोघांनी दिले होते.
- पण मालमत्ता विकण्याची पॉवर ऑफ अॅटर्नी त्याच्याकडे नव्हती.
साडेतीन कोटीची जमीन ५५ लाखांमध्ये! बॉम्बस्फोट आरोपीही सामील!
- या व्यवहारात १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषी सरदारखान हा सुद्धा सामील होता.
- ही मालमत्ता मलिक यांच्याशी संबंधित एका कंपनीला सलीम पटेल मार्फत विकण्यात आली.
- मूळ मालक असलेल्या मुनिरा यांना एक रुपयाही मिळाला नसल्याचे ईडीकडून सांगण्यात आले.
- हा संपूर्ण व्यवहार ५५ लाख रुपयांचा असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
- ५५ लाख रुपये मिळाल्यानंतर दाऊदची बहिण हसीना पारकरने ही मालमत्ता मलिकांकडे हस्तांतरीत केली.
- या जमिनीची किंमत सुमारे साडेतीन कोटी रुपये होती. पण ती ५५ लाख रुपयांना खरेदी करण्यात आली.
- ही मालमत्ता आता त्यांना विकसित करायची आहे. ही मालमत्ता मलिकांना कागदोपत्री विकणारा सलीम पटेल हा हिणदाऊदची हसीना पारकरचा हस्तक होता.
- सुमारे ३ कोटी ३० लाखांची जागा मलिक यांनी ५५ लाख रुपयांत घेतली.
आधीच्या घटनेप्रकरणी नंतरच्या कायद्यानुसार कारवाई कशी?
- मलिक यांचे वकिल अमित देसाई यांनी उपस्थित केलेले मुद्दे महत्वाचे मानले जातात.
- प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉंडरिंग म्हणजेच PMLA हा कायदा येण्यापूर्वी सहा वर्षे आधी म्हणजे १९९६मध्ये झालेल्या पॉवर ऑफ अॅटर्नीचा उल्लेख ईडीकडून केला जात आहे.
- फौजदारी दंड प्रक्रियेनुसार पूर्वलक्ष्यी प्रभावाने कारवाई करता येत नाही.
- तुम्ही वीस वर्षांनी जागे व्हाल आणि चौकशीसाठी कोठडी मागाल, हे बरोबर नाही. या प्रकरणात गॅंगस्टर दाऊदविरोधातील एफआयआर कोणी पाहिलेला नाही.
- मलिक यांचा दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याच्या आरोपात तथ्य नाही. महाविकास आघाडीचा नेता राष्ट्रविरोधी कारवायांत सहभागी असल्याचे दाखवून देण्यासाठी हा सारा खटाटोप सुरू आहे.
PMLA कायदा पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होत नाही!
- PMLA हा पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होत नाही, असे अनेक न्यायालयीन निकालांमध्ये स्पष्ट झाले आहे.
- रिमांड अॅप्लिकेशनमध्ये मलिक हे पीएमएलए कायद्यानुसार दोषी असा उल्लेख आहे.
- त्यातील `दोषी` या शब्दाला देसाई यांनी आक्षेप घेतला.
- न्यायालयांत आरोपीचा गुन्हा सिद्ध व्हायला अनेक वर्षे लागतात आणि येथे ईडीचे अधिकारी मलिक हे थेट दोषी म्हणून जाहीर करता, हे गंभीर असल्याचे अॅड. देसाई म्हणाले.
टेरर फंडिग शब्दाला आक्षेप
- अमित देसाई यांनी रिमांड रिपोर्टमधील भाषेला आक्षेप घेतला.
- ईडीने `टेरर फंडिंग` म्हणजे दहशतवादाला मदतीसाठी निधी असा उल्लेख केला आहे.
- अशा भाषेवर न्यायालयाने निर्बंध आणायला हवेत. तुम्ही पुरावे दाखवा आणि खुशाल त्यांना शिक्षा करा. पण केवळ अशी गंभीर वाक्ये उच्चारू नका.
- तुम्ही सकाळी अटक करता आणि संध्याकाळी टेरर फंडिग म्हणता?
- हा रिमांड रिपोर्ट म्हणजे हिंदी चित्रपटाचे स्क्रिप्ट आहे काय?
- हा चित्रपट नाही. हे न्यायालय आहे.
सलीम पटेल नावाच्या दोन व्यक्ती!
- ज्या सलीम पटेलच्या आधारावर ईडी आरोप करत आहेत.
- या नावाच्या दोन व्यक्ती आहेत. एक सलीम पटेल याचा मृत्यू झाला आहे आणि दुसरा जिवंत आहे असेही अॅड. देसाई म्हणाले.
- एक सलीम पटेल उर्फ फ्रूट आहे, जो छोटा शकिलचा नातेवाईक आहे.
- मलिक यांनी ज्या सलीम पटेलकडून जमीन विकत घेतली आहे तो वेगळा आहे. नवाब मलिकांना अडकवण्यासाठी हे सारे तयार केले आहे.
- ईडीने रिमांड रिपोर्टमध्ये एका ठिकाणी नवाब मलिक यांनी जमीन हसीना पारकरकडून विकत घेतली असे म्हटलं आहे.
- दुसरीकडे नवाब मलिक यांनी जमीन मुनिराकडून विकत घेतल्याचाही उल्लेख केला आहे.
- मुनिराची मालमत्ता सलीम पटेलने चुकीच्या पॉवर ऑफ अॅटर्नीद्वारे विकल्याचे म्हटले आहे.
- मग सलीम पटेलविरुद्ध आधी गुन्हा दाखल झाला आहे का, असेही देसाई यांनी विचारले.
मलिक यांच्याच फसवणुकीचा दावा!
- उलट मग या ठिकाणी मलिक यांचीच फसवणूक झाली आहे.
- ज्याला अधिकार नव्हते त्याने मालमत्ता मलिक यांना विकली.
- मूळचा गुन्हा कुठे दाखल झाला आहे?
- मुनिरा यांनी २० वर्षे काही न करता आता सलीम पटेलऐवजी मलिकांविरोधात गुन्हा दाखल करणे धक्कादायक आहे.