मुक्तपीठ टीम
खूप गाजावाजा झालेल्या आणि भाविकांच्या पसंतीस उतरलेल्या भारत दर्शन ट्रेन बंद होणार आहेत. स्वस्तातील म्हणजे अवघ्या नऊ हजारात आठ दिवसांच्या तीर्थयात्रा घडवत असल्याने भाविकांना मोठी संधी मिळाली होती. मात्र, आता या ट्रेन बंद केल्या जात आहेत. त्यांच्याऐवजी मार्चपासून खासगी कंपन्यांसह भारत गौरव ट्रेन या नव्या नावाने या ट्रेन धावणार आहेत. आधी रेल्वे पन्नास टक्के सवलत देत असल्याने तिकिट स्वस्त होते. आता मात्र ते महागण्याची भीती आहे. पाच राज्यांमधील निवडणुका संपण्याच्या सुमारास स्वस्तातील ट्रेन बंद होत असल्याने गरज भागली का, असा प्रश्न विचारला जात आहे.
आयआरसीटीसीची महत्त्वाकांक्षी ‘भारत दर्शन ट्रेन’ मार्चपासून कायमच्या बंद होणार आहेत. यात्रेकरूंना स्वस्त आणि किफायतशीर प्रवास करणाऱ्या या ट्रेनऐवजी ‘भारत गौरव ट्रेन’मधून प्रवासाची तयारी सुरू आहे. त्याचे भाडे भारत दर्शन ट्रेनपेक्षा महाग असेल.
आयआरसीटीसीचे मुख्य प्रादेशिक व्यवस्थापक अजित कुमार सिन्हा म्हणाले की, “शेवटची भारत दर्शन ट्रेन ७ मार्चला रवाना केली जाईल. ते अयोध्या, वाराणसी, जसिडीह, गया, गंगासागर, जगन्नाथपुरी, कोणार्क, विष्णुपद मंदिर या स्थानकांवर जाईल. यामध्ये प्रति व्यक्ती भाडे ९ हजार ४५० रुपये ठेवण्यात आले आहे. लखनौ, आग्रा कॅंट, ग्वाल्हेर, वीरांगना लक्ष्मीबाई (झाशी), कानपूर, बाराबंकी, अयोध्या, जौनपूर आणि वाराणसी स्थानकांवरून ट्रेनची सुविधा उपलब्ध असेल.
भारत गौरव रेल्वे लवकरच ट्रॅकवर धावणार
- रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारत दर्शन ट्रेन बंद झाल्यानंतर भारत गौरव नावाने ट्रेन सुरू होईल.
- ही ट्रेन खाजगी कंपन्या चालवतील. यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
- या कंपन्या संपूर्ण बोगी दोन ते तीन वर्षांसाठी भाड्याने देऊ शकतील, त्यानंतर दर निश्चित करून ते स्वतः तिकीट बुक करतील.
भारत गौरव रेल्वेची तिकिटे महाग असणार
- भारत दर्शन ट्रेनमध्ये यात्रेकरूंना रेल्वे प्रशासन ५० टक्क्यांहून अधिक अनुदान देत आहे.
- या कारणामुळे आठ ते दहा दिवसांचा प्रवास अवघ्या नऊ हजार रुपयांत उपलब्ध होता.
- या स्वस्त प्रवासात तिकीट, खानपान, लोकल प्रवास, निवास व्यवस्था यांचाही समावेश होता. पण भारत गौरव ट्रेनमधील संपूर्ण बोगी एफटीआर म्हणजेच फिक्स्ड टेरिफ रेटवर दिली जाईल. त्यामुळे अनुदान मिळणार असून नऊ हजार रुपयांचे तिकीट पंधरा ते वीस हजार रुपयांपर्यंत पोहोचणार आहे.