मुक्तपीठ टीम
गुजरातमध्ये २००८ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील ३८ दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अकरा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने गेल्या मंगळवारी या प्रकरणी सुनावणी पूर्ण केली होती आणि यापूर्वीच ४९ जणांना दोषी ठरवले होते. देशात आजवर एकाच खटल्यात फाशीची शिक्षा झालेल्या गुन्हेगारांची ही सर्वात मोठी संख्या आहे. पण या निकालानंतर दहशतवादविरोधी आणि गुन्हेगारी खटल्यांचा प्रदीर्घ अनुभव असलेले विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी एक इशारा दिला आहे. फाशीची शिक्षा झाली, हे चांगलंच! पण न्यायालयीन आणि पुढची दयेच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण करत वेळेत शिक्षेची अंमलबजावणी करा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार अशा आरोपींना जास्त वेळ रखडवत ठेवलं तर त्यांची सुटका कमी होवू शकते. या आरोपींच्याबाबतीत तसं होवू नये.
एकामागून एक स्फोटांनी अहमदाबाद हादरले
- २६ जुलै २००८ रोजी अहमदाबाद ७० मिनिटांच्या कालावधीत २१ बॉम्बस्फोटांनी हादरले होते.
- या हल्ल्यांमध्ये ५६ जणांचा मृत्यू झाला होता तर २०० हून अधिक जण जखमी झाले होते.
- २००२ च्या गुजरात दंगलीचा (गोध्रा हत्याकांड) बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित लोकांनी हे हल्ले केल्याचा दावा पोलिसांनी केला होता.
मोठा गुन्हा, मोठी चौकशी, खटलाही…
- अहमदाबादमधील साखळी बॉम्बस्फोटानंतर काही दिवसांनी पोलिसांनी सुरतच्या विविध भागातून अनेक बॉम्ब जप्त केले होते.
- यानंतर अहमदाबादमध्ये २० आणि सुरतमध्ये १५ एफआयआर नोंदवण्यात आले.
- न्यायालयाने सर्व ३५ एफआयआर एकत्रित केल्यानंतर २००९च्या डिसेंबरमध्ये ७८ आरोपींविरुद्ध खटला सुरू झाला.
- एक आरोपी नंतर सरकारी साक्षीदार झाला.
- या प्रकरणात आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली होती, मात्र त्यांची सुनावणी अद्याप सुरू झालेली नाही.
- खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने ११०० साक्षीदार तपासले.
- तेरा वर्षांनी अखेर लागला निकाल!
- गुजरातमध्ये २००८ मध्ये बॉम्बस्फोट झाले होते.
- न्यायालयाने १३ वर्षांनंतर या प्रकरणात ४९ आरोपींनी दोषी ठरवले.
- या खटल्यातील २८ आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
- तेरा वर्षांहून अधिक जुन्या खटल्यात न्यायालयाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये खटल्याची कार्यवाही पूर्ण केली होती.
- २००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगलीचा बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने हे स्फोट घडवल्याचा दावा पोलिसांनी केला होता.
अॅड. उज्ज्वल निकम यांनी इशारा दिला त्याचं कारण ठरलेलं प्रकरण कोणतं?
- तीन दशकांपूर्वी महाराष्ट्रात एक भयानक बालहत्याकांड घडवलं होतं.
- अंजनाबाई गावित, रेणुका शिंदे आणि सीमा गावित या तीन महिलांनी निष्पाप बालकांचे खून केले होते.
- किरण शिंदे याच्या साथीने १९९० ते १९९६ या सात वर्षात १३ मुलांचे अपहरण आणि त्यातील ९ मुलांच्या हत्या त्यांनी केल्या.
- पोलिसांनी शिताफीने तपास करून त्यांना अटक करून खटला भरला. फाशीची शिक्षा झाली.
- सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्यांची फाशीची शिक्षा कायम राहिली.
- पुढे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी २०१४ मध्ये या आरोपींचा दयाअर्ज फेटाळून लावला.
- पण दया अर्ज तीन महिन्यात निकाली काढणे आवश्यक असताना राष्ट्रपतींनी त्या अर्जावर निर्णय घेण्यास पाच वर्षे घेतले. निर्णयातील विलंबाचा लाभ देऊन फाशी माफ करण्याची मागणी आरोपींनी न्यायालयाकडे केली होती.
- त्यांच्यातील एक आरोपी अंजना गावितचा मधल्या काळात मृत्यू झाला होता.
- त्यांच्या मागणीनुसार फाशीची शिक्षा न्यायालयाकडून रद्द करण्यात आली.
- त्याऐवजी न्यायालयाने गावित बहिणींना मरेपर्यंत जन्मठेप सुनावली आहे. या दोघींचा गुन्हा माफीच्या लायकीचा नाही.
- मात्र, फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात दिरंगाई झाली, असे न्यायालयाने म्हटले.