मुक्तपीठ टीम
मराठी भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांना आवाज देणारा सहृदयी नेता सुधीर जोशी यांच्या निधनामुळे गमावला आहे. त्यांच्यासारखे व्रतस्थ आणि निष्ठावान असे उदाहरण आता दुर्मीळ झाले आहे, अशा शोकभावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुधीर जोशी यांच्या निधनाबद्दल व्यक्त केल्या आहेत. दिवंगत सुधीरभाऊंनी मुंबईचे महापौर आणि महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री म्हणून दिलेले योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल, अशी श्रद्धांजलीही दिवंगत जोशी यांना अर्पण केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी ते पहिल्या फळीतील निष्ठावान शिवसैनिक होते, त्यांच्या निधनाने शिवसेना एका सच्चा शिवसैनिकाला मुकली आहे. सुधीरभाऊंच्या जाण्याने माझी वैयक्तिक हानी झाली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी शोकभावनेत नमूद केले आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, कार्यकर्त्याचा पिंड आणि जनसामान्यांबद्दल प्रचंड कळवळा असल्यानेच दिवंगत सुधीरभाऊंनी शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून मराठी भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांना आवाज देण्याचा लढा उभारला. शिवसेनाप्रमुखांसाठी ते पहिल्या फळीतील निष्ठावंत शिवसैनिक होते. त्यांच्या राजकारण आणि समाजकारणातील समतोल साधण्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे सुधीरभाऊ अखेरपर्यंत काम करत राहीले. मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक कामगार, कर्मचारी संघटनांची त्यांनी उत्कृष्ट बांधणी केली. या संघटनेमुळेच मराठी भूमिपुत्रांना अनेक रोजगार, नोकऱ्यांच्या उत्तमोत्तम संधी मिळविता आल्या. शिवसेनेचा मुंबईचा महापौर म्हणूनही त्यांनी मराठी माणसाचा आवाज बुलंद केला. जी-जी संधी मिळेल, त्याचे सुधीरभाऊंनी आपल्या धडाडीने सोने केले. सामान्य माणसांना, कष्टकरी-कामगारांना त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी मदत करण्यात ते सातत्याने आघाडीवर होते. विधिमंडळात पोहचल्यावरही त्यांनी आपल्या अभ्यासू मांडणीने आणि अंगभूत हुशारीने अशाच प्रश्नांची मांडणी केली. त्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रश्नांवर आवाज उठवत, अनेकांना न्याय मिळवून दिला. राज्याचे महसूल मंत्री, शिक्षण मंत्री म्हणूनही त्यांना संधीही त्यांनी मिळाली. याठिकाणीही त्यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर कामाचा ठसा उमटवला. सुधीरभाऊ अखेरपर्यंत सामान्यांसाठी झटणारे निष्ठावंत कार्यकर्ते-नेतृत्व राहीले. त्यांच्या निधनामुळे मराठी भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांना आवाज देणारा सहृदयी असा नेता आपण गमावला आहे. हा आघात सहन करण्याची त्यांच्या कुटुंबियांना शक्ती मिळावी, ही ईश्वर चरणी प्रार्थना. ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुधीर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा लढवय्या नेता हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांच्या निधनाने मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा लढवय्या नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. शिवसेना पक्षस्थापनेपासून पक्ष संघटनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. मुंबईचे महापौर म्हणून त्यांची कारकीर्द संस्मरणीय ठरली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, युती शासनाच्या काळात शिक्षणमंत्री म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अभ्यासू, सुसंस्कृत नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. मराठी माणूस आणि महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील. ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांच्या कुटुंबियांच्या, कार्यकर्त्यांच्या, नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.