मुक्तपीठ टीम
देशात वीज कोसळण्याच्या आधीच त्याबद्दल सावध करणाऱ्या प्रयोगशाळेची स्थापना होतेय. यामुळे आता क्षणाचाही वेळ न घालवता, वीज पडण्याआधीच सूचीत केले जाईल. अत्याधुनिक हवामान मोजण्याचे साधन या दिशेने मदत करेल.
भुवनेश्वर येथील बालेश्वर येथे हे संशोधन चाचणी केंद्र (थंडरस्ट्रम रिसर्च टेस्टबेड) बांधले जाणार आहे. हा निर्णय पावसाळी राज्य असणाऱ्या ओडिशासाठी केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने घेतला आहे. या केंद्राच्या माध्यमातून वीज केव्हा पडणार आहे याची नेमकी वेळ समजेल. एवढेच नाही तर कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या क्षेत्रात पडणार आहे, या संदर्भात योग्य माहिती उपलब्ध होईल.
दरवर्षी लाखो लोकांचे जीव जातात यामुळे या संदर्भात भारतीय हवामान खात्याने तयारी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात बालेश्वर येथे हे केंद्र सुरू होईल. या केंद्राच्या माध्यमातून येत्या काही दिवसांत उत्तर ओडिशामधील लोकांना पावसाविषयी आणि विजेविषयी योग्य माहिती मिळेल. असे केंद्र स्थापन होणारा बालेश्वर हा देशातील पहिला जिल्हा आहे. उत्तर ओडिसामध्ये वीज कोसळल्यामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे हे केंद्र बालेश्वर जिल्ह्यात स्थापित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भू-विज्ञान मंत्रालय, आयएमडी, इस्रो आणि डीआरडीओ संयुक्तपणे त्यामध्ये काम करतील. या केंद्राचे संपूर्ण काम पूर्ण होण्यास ५ वर्षे लागतील.
भुवनेश्वर प्रादेशिक हवामान केंद्राचे संचालक एच.आर.विश्वास म्हणाले की, आजही आम्ही वीजेविषयीआणि पावसासंदर्भात सावध माहिती देत आहोत. परंतु, विज्ञानाच्या विकासासह आपण आपले तंत्रज्ञानही विकसित करीत आहोत. ओडिशाप्रमाणेच महाराष्ट्रातही वीज कोसळण्याच्या घटना घडतात. भविष्यात येथेही अशी प्रयोगशाळा उभारली जाऊ शकते. असे उच्च क्षमतेचे तंत्रज्ञान दिल्यास, वादळ व वीज कोसळण्याचे अचूक स्थान आणि वेळ आपल्याला कळू शकेल. यामुळे दरवर्षी कोट्यवधी प्राण वाचतील.