मुक्तपीठ टीम
जागेच्या व्यवहारात चेक बाऊंस झाल्याप्रकरणी पालघरमधील शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांना एक वर्षाचा तुरुंगवास आणि एक कोटी ७५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाने चेक बाऊंस प्रकरणात हा निकाल दिला आहे. या निर्णयाविरोधात सत्र न्यायालयात जाणार असल्याचे गावित यांनी सांगितले.
नेमकं प्रकरण काय?
- खासदार गावित यांनी पालघरमधील साईनगर येथील आपली जागा विकसित करण्यासाठी पालघर पूर्व येथील चिराग कीर्ती बाफना या बांधकाम व्यावसायिकाकडून एक कोटी रुपये घेतले होते.
- मात्र एकच जमीन दोघांना देण्यात आल्याचे प्रकरण समोर आल्यावर बाफना यांनी २०१७मध्ये पालघरच्या दिवाणी न्यायालयात फसवणुकीचा दावा दाखल केला.
- या प्रकरणी दोघांमध्ये २०१९मध्ये अडीच कोटी रुपयांची तडजोड झाली होती.
- त्यानुसार गावित यांनी बाफना यांना दिलेला एक कोटी रुपयांचा धनादेश वटला.
- परंतु, उर्वरित २५ लाखांचे सहा धनादेश बाऊन्स झाल्याने बाफना यांनी कलम १३८नुसार पालघर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात दावा दाखल केला.
१४ मार्च २०२२ रोजी याप्रकरणी पुन्हा सुनावणी!
- या प्रकरणी सोमवारी अंतिम सुनावणी झाली.
- त्या दाव्याचा निकाल प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी विक्रांत खंडागळे यांनी दिला असून त्यानुसार पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांना एक वर्ष शिक्षा आणि १ कोटी ७५ लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे.
- शिवाय या संदर्भात खासदार राजेंद्र गावित यांना अपिल करून निकालाविरोधात स्थगिती आणण्याची मुभा देण्यात आली आहे.
- खासदार राजेंद्र गावित यांनी याप्रकरणी न्यायालयात दाद मागितल्याची माहिती मिळाली आहे.
- याप्रकरणी न्यायालयाने एक महिन्याची स्थगिती दिल्याचेही वृत्त आहे.
- मिळालेल्या माहितीनुसार १४ मार्च २०२२ रोजी याप्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे.