मुक्तपीठ टीम
मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब घालून वर्गात बसण्यापासून रोखण्यात आल्याने कर्नाटकात महाविद्यालये आणि शाळांबाहेर हिजाब समर्थक आणि हिजाब विरोधक गटांकडून निदर्शने करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी यांनी हे वक्तव्य केले आहे. प्रियंका गांधी म्हणाल्या की, बिकिनी असो वा हिजाब किंवा जीन्स असो, तो महिलांचा अधिकार आहे. हा अधिकार भारतीय राज्यघटनेने त्यांना दिलेला आहे. महिलांवरील अत्याचार थांबवा.यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेससाठी दिलेल्या ‘लडकी हूं लड़ सक्ती हूं’ घोषणेचा हॅशटॅगमध्ये उल्लेख केला आहे.
हिजाब वादामागे काँग्रेसचा हात, भाजपाचा आरोप
- दरम्यान, हिजाबच्या वादामागे काँग्रेसचा हात असल्याचे भाजपाने म्हटले आहे.
- कर्नाटक भाजपाने ट्विट केले की, हिजाब वादामागे काँग्रेसचा हात असल्याचे आम्ही म्हणत आहोत.
- उच्च न्यायालयात हिजाबच्या बाजूने युक्तिवाद करणारे वकील काँग्रेसच्या कायदेशीर सेलचे प्रतिनिधी आहेत.
- काँग्रेस या दिशेने काम करत आहे हे सांगण्यासाठी दुसरे उदाहरण हवे का?
- भाजपाच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना वकील देवदत्त कामत म्हणाले, “मी सुदैवाने स्वतंत्र देशात राहतो.
- एक वकील या नात्याने, मला निर्देशित केलेल्या कोणत्याही विषयावर मी हजर राहून युक्तिवाद करतो.
- कोणताही तृतीय पक्ष किंवा कोणताही राजकीय पक्ष माझ्या निवडीवर शंका घेऊ शकत नाही!
हिजाबचा मुद्दा जानेवारीपासून होता चर्चेत
- हिजाबचा हा मुद्दा कर्नाटकात जानेवारीमध्ये सुरू झाला होता.
- जानेवारीमध्ये उडुपी येथील सरकारी पीयू कॉलेजमध्ये ६ मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब घालून वर्गात बसण्यापासून रोखण्यात आले होते.
- महाविद्यालयाने गणवेश धोरणाचे कारण सांगितले, त्यानंतर विद्यार्थिनींनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि असा युक्तिवाद केला की त्यांना हिजाब घालण्याची परवानगी न देणे हे घटनेच्या कलम १४ आणि २५ अंतर्गत मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे.
- राज्य सरकारने तीन दिवस शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
- याशिवाय सरकारने सर्व पक्षांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.