मुक्तपीठ टीम
कर्करोगानं ग्रासण्याचं प्रमाण सर्वत्र वाढत असताना त्यासाठीच्या उपचार सुविधा आजही मर्यादित आहेत. त्यामुळे टाटा मेमोरियल सेंटरसारख्या संस्था कर्करोग संशोधन आणि उपचारासाठी राबवत असलेल्या उपक्रमांचं महत्व खूप मोठं आहे. आता ही संस्था रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मौजे तांबाटी येथे कर्करोग रुग्णालय व रिसर्च सेंटर उभारण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी त्यांनी राज्य सरकारकडे जमिनीची मागणी केली आहे.
उद्योग राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी याबद्दल माहिती दिली. मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरकडून ही मागणी करण्यात आली आहे. खालापूर तालुक्यातील मौजे डोणवत व मौजे तांबाटी येथील जागेची मागणी कर्करोग रुग्णालय व रिसर्च सेंटरसाठी टाटा मेमोरियल सेंटर यांनी महसूल विभागाकडे केली आहे. याबाबत पुढील कार्यवाहीसाठी आयोजित बैठकीमध्ये पालकमंत्री कु. तटकरे बोलत होत्या. कर्करोग या आजारावर सर्वसामान्यांसाठी आवश्यक आरोग्यसेवेसाठी व याप्रमाणे जिल्ह्यात होणाऱ्या प्रत्येक जनहितार्थ कार्यांचे नेहमीच स्वागत असल्याचे सांगितले.
उद्योग राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या, ग्रामपंचायत हद्दीतील या जागेबाबत सविस्तर सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात यावा. ग्रामस्थांना नागरी सुविधांसाठी आवश्यक असलेल्या जागेव्यतिरिक्त सविस्तर सर्वेक्षण अहवाल त्वरित सादर करावा. सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून होणाऱ्या प्रत्येक कार्यासाठी स्थानिकांचा सकारात्मक सहभाग असावा. त्याबाबत ग्रामपंचायत पातळीवर स्वागताची भूमिका कायम असावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य नरेश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, गटविकास अधिकारी बालाजी पुरी, कर्जतचे प्रांत अधिकारी अजित नैराळे, खालापूर तहसिलदार अयुब तांबोळी, तांबाटी गावचे सरपंच अनिल जाधव आदी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
प्रस्तावित कॅन्सर रुग्णालयासंदर्भात माहिती देताना घनकचरा व्यवस्थापन, ओला-सेंद्रिय कचऱ्यातून बायोगॅस निर्मीती, सांडपाणी व्यवस्थापन आदीसाठी टाटा समूहामार्फत अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या उपाययोजना या परिसरात भविष्यात कार्यान्वित करण्यात येतील, असे टाटा मेमोरिअल कॅन्सर हॉस्पिटलचे प्रतिनिधी डॉ. बडवे यांनी सांगितले.
पाहा व्हिडीओ: