अपेक्षा सकपाळ / मुक्तपीठ टीम
दक्षिणेकडून उत्तरेकडे. उत्तरेकडून दक्षिणेकडे. पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे. हे सारं कमी की काय जोगेश्वरी, गोरेगावच्या छोट्या रस्त्यांवरूनही सर्व्हिस रोडमार्गे वेस्ट्रन एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक सुरुच असते. सतत. अविरत. वाहनांची गजबज. अगदी रोज या रस्त्यांचा वापर करणारे स्थानिक जोगेश्वरी, गोरेगाव या उपनगरांमधील नागरिकही रस्ता ओलांडताना बिचकतात. शालेय विद्यार्थ्यांच्या काळजीने पालक बेजार होतात. त्यामुळेच जोगेश्वरीचे स्थानिक आमदार रवींद्र वायकर यांनी मुंबईतील वेस्टर्न हायवे आणि जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड जंक्शनच्या खालून भुयारी पादचारी मार्ग बांधण्याची संकल्पना मांडली आहे. त्यांनी एमएमआरडीए आयुक्तांना तसा प्रस्तावही पत्राद्वारे पाठवला आहे.
जोगेश्वरीसाठी दक्षिण मुंबईतील भुयारी मार्गासारखा पर्याय
- पश्चिम द्रुतगती महामार्ग व जोगेश्वरी विक्रोळी जोडरस्ता जंक्शन येथून रस्त्याच्या दुतर्फा राहणार्या रहिवाशांना तसेच पादचार्यांच्या सोयीसाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
- अपघातविरहीत रस्ता ओलांडणे शक्य व्हावे यासाठी दक्षिण मुंबईतील काळाघोडा परिसरात मेट्रो सिनेमालगत उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गाचे उदाहरण देण्यात आले आहे.
- त्याच भुयारी मार्गाच्या धर्तीवर पश्चिम द्रुतगती महामार्ग व जोगेश्वरी विक्रोळी जोडरस्ता जंक्शनवर भुयारी मार्ग बांधण्यात यावा, असे पत्र जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर यांनी एमएमआरडीए आयुक्तांना पाठवले आहे.
आधीच्या वाहतुकीच्या त्रासात मेट्रो बांधकामामुळे भर!
- एमएमआरडीएमार्ङ्गत मेट्रो मार्गिका क्रमांक ६ स्वामी समर्थ नगर अंधेरी (पश्चिम) ते कांजुर मार्ग व मेट्रो मार्गिका क्रमांक ७ अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) या दोन मेट्रो मार्गिकेचे काम सध्या या ठिकाणी सुरू आहे.
- जोगेश्वरी (पूर्व) पश्चिमेस जोडणार्या हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलाच्या निर्मितीनंतर या ठिकाणी रस्ते वाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.
जोगेश्वरीच्या या जंक्शनवर वाढती वाहतूक, अपघाताचा वाढता धोका!
- या दोन्ही मेट्रो रेल्वेची बांद्रेकरवाडी व एमएमआरडीए कॉलनी येथे मेट्रो स्थानके होणार आहेत. या महामार्गालगत कामगार वस्ती ही तुलनात्मकदृष्या जास्त आहे.
- पश्चिम द्रुतगती महामार्गालगत असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ट्रामा केअर सेंटर, अस्मिता विद्यालय या संस्था असल्याने रहदारीही जास्त असते.
- या महामार्गालगतच प्रतापनगर, शिवटेकडी, रामवाडी, मजास गाव टेकडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वसली आहे.
- येथील रहिवाशांना महामार्गावरुन भरधाव जाणार्या गाड्यांच्या मधून जीवावर उदार होऊन रस्ता ओलांडावा लागतो.
मेट्रोसारख्या भुयारी मार्गाने सुटेल समस्या
- मुंबई शहरातील मेट्रो सिनेमा येथील चारही दिशेस रस्ते जात असल्याने येथून पादचार्यांना अपघात विरहीत रस्ता ओलांडता यावा यासाठी या ठिकाणी भुयारी मार्गाची निर्मिती करुन रहदारी सुरक्षित करण्यात आली आहे.
- परंतु पश्चिम द्रुतगती महामार्ग ते जोगेश्वरी विक्रोळी जोडरस्ता जंक्शन या ठिकाणी अशाप्रकारे भुयारी मार्ग नसल्याने हे जंक्शन अपघाताचे केंद्र बनत चालले आहे.
- या ठिकाणी वाहतुक कोंडीची परिस्थिती पाहता भुयारी मार्गाची नितांत आवश्यकता असल्याने वायकर यांनी २०१३ पासून सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता तसेच सह सचिव, विकास विभागाचे कार्यकारी अभियंता विभाग क्र.४, अंधेरी (पश्चिम) यांच्याकडे पत्रव्यवहारही केला आहे.
- नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रथम प्राधान्य देत येथील प्रस्तावित भुयारी मार्गास आवश्यक ती परवानगी मिळावी व मेट्रो मार्गिकेच्या कामाबरोबरच या कामाला प्राधान्य देऊन, नागरीकांना दिलासा द्यावा, असे पत्र आमदार रविंद्र वायकर यांनी एमएमआरडीएचे आयुक्त यांना पाठविले आहे.
पाहा व्हिडीओ: