रॉबिन डेव्हि़डसन / सांगली
सर्व यंत्रणांना चकवा देत मोठ्या प्रमाणात चंदनाची तस्करी दाखवलेला पुष्पा चित्रपट सध्या चर्चेत आहे. प्रत्यक्षातही तसे रक्तचंदनाच्याबाबतीत घडत असल्याची प्रचिती सांगलीत आली. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यातील यंत्रणेला चकवा देत महाराष्ट्रात तस्करी होत असलेल्या दोन कोटी ४५ लाख ८५ हजाराचे ९८३ किलो ४०० ग्रॅम रक्तचंदन मिरजेत पोलीस आणि वन विभागाने धाड टाकून पकडले. यावेळी यासिन इनायतउल्ला (रा. अनेकळ, जि. बंगलुरु) याला ताब्यात घेण्यात आले.
आंध्र प्रदेश मधील जंगलातून मोठ्या प्रमाणात चंदनाची तस्करी कशी केली जाते यावर प्रकाश टाकणारा चित्रपट पुष्पा नुकताच प्रदर्शित झाला होता. याची मोठी चर्चा सर्वत्र होती. अशाच प्रकारे रक्तचंदन महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, उपाधिक्षक अशोक विरकर आणि सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या पथकाने वन विभागाच्या साह्याने चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी रविवारी पहाटे तस्करी होत असलेले रक्तचंदन मिरजेतून जाणार असल्याची माहिती रविराज फडणीस यांना मिळाली.
सहायक पोलिस निरीक्षक फडणीस यांनी मिरज – कोल्हापूर रस्त्यावर पहाटेच्या सुमारास सापळा लावला. यावेळी फळ वाहतूक होत असल्याचा फलक लावून जाणारा KA १३ ६९०० हा टेम्पो पोलिसांना आढळून आला. त्याची तपासणी केली असता त्यामध्ये २ कोटी ८५ लाखाचे ९८३ किलो ४०० ग्रॅम चंदन असल्याचे निदर्शनास आले. ते जप्त करण्यात आले असून हे रक्त चंदन नेमके आले कुठून याचा तपास सांगली पोलीस करीत आहेत.